(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ACB Trap: लाच घेण्यासाठी आला अन् साडेनऊ लाखांसह सोनं गमावून बसला; एसीबी पथकाची अशीही कारवाई
Jalna ACB Trap: या प्रकरणी रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna ACB Trap: जालना (Jalna) तक्रारदाराकडून 75 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फौजदाराच्या गाडीत 9 लाख 41 हजारांची रोकड आणि 25 तोळे सोनं लाच-लुचपत प्रतिबंधात्मक विभागानं जप्त केलं आहे. अटकपूर्व जामीन मिळालेल्या तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करण्यासाठी जालना पोलीस दलातील फौजदार गणेश शिंदे यांने एक लाखांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी अंती काल पोलीस स्टेशनच्या आवारातच तक्रारदाराकडून 75 हजारांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एसबीच्या पथकाला कारवाई दरम्यान लाचखोर फौजदार गणेश शिंदेच्या गाडीत 9 लाख 41 हजारांची रोकड आणि 25 तोळे सोनं आढळून आलं आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांच्याविरुद्ध जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता. मात्र गणेश शिंदे याने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी छत्रपती संभाजीनगर लाच-लुचपत विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला होता. दरम्यान, गणेश शिंदे याने 75 हजार रुपये लाच स्वतः स्वीकारली. पण लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा पथकाचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह एसीबीच्या पथकाला धक्का देऊन पळ काढला.
त्यामुळे एसीबीच्या पथकाने देखील त्याचा पाठलाग देखील केला. दरम्यान पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले. मात्र त्याला ताब्यात घेताच त्याने लाचेची रक्कम पाठलागादरम्यान फेकून देऊन पुरावा नष्ट केला. तर एसीबीच्या पथकाने त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये आणि 25 तोळे सोने मिळून आले. त्यामुळे गणेश शिंदे विरोधात कदिम जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेच्या मोहात दहा लाखांसह सोनं गमावून बसला...
गणेश शिंदे याने तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागीतीली होती. मात्र तक्रारदाराने एसबीकडे तक्रार केल्याने त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. पण याबाबत शिंदेला कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे लाच घेण्यासाठी येताना त्याने आपल्या गाडीत 9 लाख 41 हजार रुपयांसह 25 तोळे सोनं घेऊन आला. पण एसबीने कारवाई केली आणि गाडीतील रक्कम आणि सोनं देखील जप्त केलं. त्यामुळे 75 हजाराच्या लाचेसाठी हा फौजदार साडेनऊ लाखांसह सोनं गमावून बसला.
इतर महत्वाच्या बातम्या:
…अन्यथा तुमच्या वाहनांना समृद्धी महामार्गावर 'No Entry'; अर्ध्या रस्त्यातून परतावे लागेल