मोठी बातमी! आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी समाजाचे साखळी उपोषण
Antarwali Sarathi : मराठा आरक्षणासाठी नियुक्त न्यायमूर्ती शिंदे समिती तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे साखळी उपोषण सुरु होत आहे. मराठा आरक्षणासाठी नियुक्त न्यायमूर्ती शिंदे समिती तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी फाट्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी नियुक्त न्यायमूर्ती शिंदे समिती तत्काळ रद्द करावी, मराठा समाजाला वाटप करण्यात आलेली कुणबी जातीचे प्रमाणपत्र तत्काल रद्द करावी, जातीनिहाय जणगणना करण्यात यावी, ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये आदी मागण्यासांठी वडीगोद्री येथील आंतरवाली सराटी फाटा येथे आजपासून ओबीसी समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ओबीसी समाजबांधवांनी सोमवारी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन सादर केले आहे. ज्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तर मराठा समाजाला कुणबी मधून ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, वाटप केलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला
एकीकडे मराठा आरक्षणाचा केंद्र बनलेल्या आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या वतीने सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरु आहे. स्वतः मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे. तर, दुसरीकडे ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये यासह आदी मागण्यासांठी आंतरवाली सराटी फाटा म्हणजेच वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी उपोषण होत आहे. यामुळे शासन या दोन्ही आंदोलन कसे हातळणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.तर, या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जालन्यात आता ओबीसी समाजही आक्रमक...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केल्याने जालना जिल्हा चर्चेत आला होता. त्यात जालना शहरात मराठा आरक्षणावरून झालेली जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या होत्या. असे असतानाच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ असा वाद पुढे आला. तसेच, ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये अशी मागणी होऊ लागली. याचवेळी भुजबळ यांनी आंतरवाली सराटी जवळच असलेल्या एका गावात ओबीसीची भव्य सभा घेतली. त्यानंतर आता आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी समाजाचे साखळी उपोषण सुरु होत आहे. त्यामुळे जालन्यात आपल्या मागण्यासाठी ओबीसी समाजही आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: