Nitin Gadkari Jalna : जालन्यात कॅन्सर रुग्णांची संख्या का वाढली? नितीन गडकरी यांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Jalna : जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या नितीन गडकरी यांनी जालन्यात वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येवर भाष्य केले.
Nitin Gadkari Jalna : मागील काही दिवसांत जालना (Jalna) शहरात कॅन्सर रुग्णांची (Cancer Patients) संख्या वाढली असून, त्यामुळे टाटाने जालन्यात कॅन्सर हॉस्पिटल उघडले आहे. मात्र, जालन्यात कॅन्सर रुग्णांची संख्या का वाढली? याचं कारण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध उपक्रमांची उद्घाटन करण्यात आले. जालना शहराजवळील दिनेगाव येथे “गती शक्ती कार्गो टर्मिनल”चेही (ड्रायपोर्ट) दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी देखील उपस्थित होते आणि याचवेळी बोलतांना त्यांनी जालन्यात वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, "मागे मी ऐकलं की टाटाने जालन्यात कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले आहे. का उघडलं याची चौकशी केल्यावर लक्षात आले की, जालन्यात कॅन्सर जास्त आहे. कारण येथे वायु प्रदूषणाची अडचण आहे. हे शरीरासाठी चांगलं नाही. त्यामुळे प्रदूषणाच्या दृष्टीने कारखानदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.
ड्रायपोर्टमुळे रोजगार निर्माण होणार...
पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की, संपूर्ण जगामध्ये आपला माल आयात-निर्यात करण्यासाठीच्या जेएनपीटी बंदरावर ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा ड्रायपोर्टमुळे जालन्यात मिळणार आहेत. ड्रायपोर्टमुळे येथे रोजगार निर्माण होवून येथील तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी कापसाच्या गाठी आणि सूत जालना येथून नागपूर येथे येवून ते हल्दीया कोलकता मार्गे बांग्लादेशामध्ये जाईल. यामुळे लॉजिस्टिक किंमत कमी होवून आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाड्यासह नागपुरातील फळ-पिके तसेच उद्योगातील पक्का माल देश व विदेशात सर्वत्र जाईल आणि जालना शहर जगाच्या पटलावर येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे कामही सुरु करण्यात येणार
पंधरा वर्षापेक्षा जास्त चाललेली वाहने स्क्रॅप करण्याचा कायदा भारत सरकारने संमत केला आहे. त्यामुळे ॲल्युमिनीयम, कॉपर, रबर, प्लॅस्टिक, स्टील हे रिसायकलींग होणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे कामही सुरु करण्यात येणार असून, पुढे हा मार्ग समृध्दी महामार्गाला जोडला जाणार आहे, त्यामुळे जालना शहराला याचा फायदा होणार आहे. निर्यातीमुळे या भागाचा औद्योगिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले. ड्रायपोर्टमुळे जालना शहराच्या विकासात भर पडणार असून याच परिसरात इंडस्ट्रीयल झोन तयार झाल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :