Jalna News: शासन आपल्या दारी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17 ऑगस्ट रोजी जालना दौऱ्यावर; पूर्वतयारी बैठक संपन्न
“शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात 17 ऑगस्ट रोजी कार्यक्रम पार पडणार आहे.
Shashan Aplya Dari in Jalna : “शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भागात 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
“शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात 17 ऑगस्ट रोजी कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राहूल देशपांडे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे विभागीय जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी, कृषी, महसूल व इतर सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी दिल्या 'या' सूचना
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले की, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी व सर्व विभागप्रमुखांनी आढावा बैठक घेवून कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करावे. आपल्याकडील विविध योजनांचे प्रलंबित असलेले अर्ज येणाऱ्या सात दिवसांत निकाली काढावेत. कार्यक्रमाबाबत जनजागृती करावी. कार्यक्रम स्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत.
तसेच कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्नीशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे उपस्थितांची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.
यापूर्वीचा दौरा झाला होता रद्द
शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना शहरात 25 जून रोजी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली होती. मात्र, पुढे हा दौरा रद्द झाला होता.