जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 10 तलाठी निलंबित, आणखी 10 ते 15 तलाठी रडारवर; जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई
Jalna News : जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात 34 कोटी 97 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलंय.

Jalna News : जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात 34 कोटी 97 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलंय, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केलीय. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. यात 26 तलाठी आणि 10 कृषी सहायक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी सर्वच दोषी तलाठ्यांना 48 तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 10 जणांवर निलंबांची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत असून आणखी 10 ते 15 जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्या इतरांचेही धाबे दणणाणले असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्ह्यात 5 महिन्यात 112 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 36 कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा
नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर कारणाला कंटाळून बीड जिल्ह्यात जानेवारी 2025 ते 10 जून 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच समोर आले. त्यापैकी 95 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर 14 प्रकरणे अपात्र ठरवून 84 प्रकरणे पात्र ठरवली आहेत. 48 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाचे एक लाख रुपयांची मदत मिळाली असून 36 शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 27 शेतकरी आत्महत्येची नोंद आहे.
बीडमध्ये जून मध्येच जिल्ह्यातील 11 प्रकल्प ओवरफ्लो; 13 दिवसात 38 मिलिमीटर पाऊस
यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली आहे. मे महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. तर तीन प्रकल्पांमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त साठा झाला आहे.
बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली. तर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढली आहे. 1 ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात 38 मिलिमीटर पाऊस झाला. जो सरासरीच्या 4% इतका आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती
100% भरलेले 11 प्रकल्प,
75 टक्के भरलेले तीन
50 ते 75 टक्के भरले आठ
25 ते 50 टक्के भरलेले 21
25% पेक्षा कमी 46
जोत्याखाली असलेले 54 आणि तीन प्रकल्प कोरडे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























