Jalgaon Shivsena : आमदार चिमण आबा पाटलांना सोडणार नाही, त्यांच्या गाडीच्या काचा फोडू, रवींद्र चौधरींचा इशारा
आमदार चिमणआबा पाटील तालुक्यात परत आल्यावर त्यांच्या गाडीच्या काचा फोडू असा इशारा एरंडोल तालुक्याचे शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी दिला आहे.
Jalgaon Shivsena News : ज्यांच्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. केसेस अंगावर घेतल्या तेच उद्धव साहेबांना सोडून लोभापाई एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. अशा आमदार चिमणआबा पाटील यांना आम्ही सोडणार नाही. ते तालुक्यात परत आल्यावर त्यांच्या गाडीच्या काचा फोडू असा इशारा एरंडोल तालुक्याचे शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी दिला आहे. चिमणआबा पाटील यांना पुन्हा कधीही निवडून येऊ देणार नाही. ते निवडून आलेच तर मी आत्महत्या करेल असा इशाराही रवींद्र चौधरी यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदाराविरुद्ध राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक देखील या बंडखोर आमदारांविरुद्ध संतप्त झाले आहेत. त्याचप्रकारे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांना तालुक्यात फिरु देणार नाही, त्यांच्या गाडीच्या काचा फोडू असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या आमदार चिमणराव पाटील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही थेट इशारा रवींद्र चौधरी यांनी दिला. एरंडोल इथे आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
ज्या नेत्यांसाठी जीवाचं रान केलं, अंगावर केसेस घेतल्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर आमदार झाले. त्या पारोळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत बंडखोरी केली. ते खुर्चीच्या मोहापायी, पैशाच्या लोभापायी एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप करण्यात आला. अशा चिमणराव पाटील यांच्याविरोधात प्रत्येक कार्यकर्ता संताप व्यक्त करत आहे. पुढच्या निवडणुकीत चिमणराव पाटील यांना त्यांची जागा दाखवू, जर ते पुन्हा निवडून आले तर मी आत्महत्या करेल, असेही चौधरी म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी रात्री भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिलेत. तसेच राज्यपालांनी उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.