Jalgaon News: सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ, काम मिळत नसल्याने बंगाली सुवर्ण कारागिरांची घरवापसी
Jalgaon Gold News: मागील दोन ते तीन वर्षात दागिने तयार करण्यासाठी आलेले नविन तंत्रज्ञान तसेच भाववाढीमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.
जळगाव: सोन्याच्या किमतीत मोठी (Gold Price Hike) वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आता विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. परिणामी सोन्याला मागणी नसल्याने सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कामगारांना काम मिळत नाही. जळगावातील 50 टक्के बंगाली कारागिरांनी रोजगाराअभावी घरवापसी केल्याचे समोर आले आहे
सोन्याच्या वाढत्या महागाईमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा गुंतवणुकीकडे कल वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. शुद्ध सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगाव शहराला 'सुवर्ण नगरी' म्हणून ओळखले जाते. शुध्द सोन्यासह दागिन्यांच्या नवीनतम श्रृखंलेसाठीही जळगावच्या सराफ बाजाराची देशभर ख्याती होती. जळगावात सुमारे 20 ते 22 हजार बंगाली कारागीर दागिने बनवतात. मात्र, मागील दोन ते तीन वर्षात दागिने तयार करण्यासाठी आलेले नविन तंत्रज्ञान तसेच भाववाढीमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. यामुळे या बंगाली कारागिरांच्या हाताला काम मिळत नसल्याने सुमारे 50 टक्के कुशल बंगाली कारागिरांनी रोजगार अभावी घरवापसी केली आहे. तर उर्वरीत सहा ते सात हजार कारागीर देखील जळगाव सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती असल्याने सोने व्यवसाय करणाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत
जळगावच्या शुद्ध सोन्याचा नावलौकिक जगभर पसरला आहे. त्यामुळेच येथे राज्यभरातूनच नव्हे तर देश-परदेशातून ग्राहक सोने घेण्यासाठी येतात. विश्वासार्हता, सचोटी आणि सोन्याच्या दागिन्यांमधील विविधता जळगाव सुवर्ण बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. सुमारे 165 वर्षांपेक्षा जास्तचा इतिहास असलेला तब्बल एक हजार कोटींहून अधिकची वार्षिक उलाढाल असलेला जळगावचा सराफ बाजार आहे.
दागिने घडविण्यासाठी हजारो बंगाली कारागीर
अस्सल सोन्यासह दागिन्यांच्या डिझाइनमधील विविधता ही देखील जळगावच्या सुवर्ण बाजराची जमेची बाजू होती. यासाठी बंगालहून मागील 25 वर्षांपासून जळगावात अनेक बंगाली कारागीर आपल्या हातांनी सोन्याचे दागिने घडवतात. गोलाणी मार्केट, सराफ बाजार, बालाजी पेठ या भागात सुमोर 25 हजारावर बंगाली कारागीर 15 ते 17 तास काम करुन जळगावातील मोठ्या सुवर्णपेढ्यांसाठी दागिने घडवित असत.
तीन वर्षात कारागिरांची संख्या कमी
मागील तीन ते चार वर्षात सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव, शासनाची नविन कर प्रणाली, दागिन्यांऐवजी सोन्याची चीप, बिस्किटाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. तसेच तंत्रज्ञानामुळे मोठ्या शहरातून येणाऱ्या तयार दागिन्यांमुळे या कारागिरांना मिळणारे 80 टक्क्यांना कमी झाले आहे. मागील तीन वर्षात जळगावातील 15 हजारावर बंगाली कारागीर आपल्या गावी परतले आहेत. सोन्यावर कलाकुसर करणारे त्यांचे कुशल हात आता शेतात राबू लागले आहेत.
सोन्याची भाववाढ, जीएसटीचा प्रभाव
सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची मानसिकता, व्यवसायात झालेले यांत्रिकीकरण, तसेच फॉर्मिंगच्या कमी किमतीच्या दागिन्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. मुंबई, राजकोटवरुन रेडीमेड दागिने घेण्याकडे व्यावसायिकांचा कल जळगावातील होलसेल मार्केट घटले.
जळगावात गेल्या 28 वर्षापूर्वी सोन्याचे दागिने घडविण्यासाठी आलो होतो. माझ्यासोबत जळगावात विविध ठिकाणी 20 हजारावर कारागीर होते. मात्र, मागील काही वर्षात सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने काम मिळणे अवघड झाले. त्यामुळे बहुसंख्य कारागीर आता घरी परतले आहेत. येथे राहण्याचा खर्च तसेच घरी पाठविण्यासाठी लागणार पैसे याचे गणित जुळत नसल्याने आता जवळपास सात हजार कारागीर देखील घरी जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे कारगीर अजित दिलई म्हणाले.
सोन्याचे भाव एकदम वाढल्याने सोन्याचे खरेदी कमी झाली आहे. त्याचबरोबर जळगाव सोन्यासाठी प्रसिध्द असल्याने काही वर्षांपूर्वी जळगावात सोन्याचा होलसेल व्यापार देखील मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे येथूनच दागिने तयार केले जायचे. मात्र, आता होलसेल व्यापार कमी झाला आहे. तसेच मुंबईवरुन मालाची आवक होत असल्याने बंगाली कारागिरांचे काम कमी झाले. मात्र आमच्या कामगारांना कायम काम राहवे आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहे. तसेच आमचे सुवर्ण कारागीर कायम असल्याचं बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी म्हटले आहे