Jalgoan News : मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ, जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर कारवाईचे आदेश
Jalgoan News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावरील संचालक मंडळावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Jalgoan News : शिंदे-फडणवीस सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. तर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावरील संचालक (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) मंडळ बरखास्त केल्यानंतर आता संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा दूध संघाचा दहा कोटींचा निधी शासनाची कुठली परवानगी न घेता संचालक मंडळाने परस्पर खर्च केल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी विभागीय सहनिबंधकांना कारवाईचे आदेश देत तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जळगाव जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करत शिंदे फडणवीस सरकारने मोठा धक्का देत चौकशी समिती देखील नियुक्त करण्यात केली होती. या चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी सरकारच्या परवानगीशिवाय संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचं उघड झालं. तसंच दूध संघाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकरण प्रकल्पात आर्थिक अनियमितता असल्याचंही चौकशीत समोर आलं. त्यानंतर सरकारचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांना दिले असून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितलं आहे.
जुलै महिन्यात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचं संचालक मंडळ बरखास्त
सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला. जुलै महिन्यात खडसे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघातील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली. तसंच दूध संघातील कारभारामधील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली. या मुद्यावरुन एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. दूध संघ मिळवण्यासाठी विरोधकांचे हे उपदव्याप असल्याचं खडसेंनी म्हटलं. तसंच राजकीय हेतूने दूध संघाच्या कारभारासाठी समिती नियुक्त केली. दूध संघावर नियमबाह्य पद्धतीने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं. अशाप्रकारचे प्रशासक नियुक्त करण्याचा अधिकार या क्षणी सरकारला नाही, असं खडसे म्हणाले होते.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील सत्ता संघर्ष शिगेला
जळगाव जिल्हा दूध संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) या अध्यक्ष आहेत. गेल्या सात वर्षांच्यापासून एकनाथ खडसे गटाचे संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन गट सक्रिय झाला. त्यानंतर जळगाव जिल्हा दूध संघातील खडसे गटाचे संचालक मंडळ विविध आरोपाच्या आणि मुदत संपल्याच्या कारणास्तव बरखास्त करण्यात आले होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय मंडळाने दूध संघात ताबा मिळवला होता. या घटनेनंतर खडसे गटाच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने दोन्ही गट दूध संघावर आपलीच सत्ता असल्याचं सांगत आहेत.
संबंधित बातम्या