(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Crime : जळगावमध्ये अज्ञाताकडून घरावर गोळीबार, घरात कुणी नसल्याने अनर्थ टळला, आठ दिवसांतील दुसरी घटना
Jalgaon Crime : जळगावमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.
Jalgaon Crime : नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रात गुन्हेगारीचं (Crime) सत्र सध्या वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यातच जळगावातील (Jalgoan) एका घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. जळगाव शहरातील शिवाजी नगरात एका व्यक्तीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेसंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे. पण या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलीस प्रशासन देखील या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. जळगाव शहरातील केसी पार्क परिसरात त्रिभुवन कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.
गुरुवार (27 जुलै) रोजी अशोक माने यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींना गोळीबार केला. तसेच गोळीबार केलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक देखील केली. अशोक मान यांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. तेव्हा जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत आरोपींनी तेथून पळ काढला. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखांच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत. तसेच लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जळगावमधील ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच त्याच परिसरात ही दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच या घटनेतील आरोपींचा गोळीबार करण्याचा मुख्य हेतू कोणता होता हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात पोलिसांना कोणती माहिती मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आरोपींचा नेमका हेतू काय होता याची देखील चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता काय समोर येतं हे पाहणं गरजेचं आहे.
पण जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोन ते तीन राऊंड या ठिकाणी फायर झाल्याचे हे पोलिसांचं म्हणणं आहे. पण तराही मुख्य कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने घरी कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी या घटनेमध्ये झाली नाही. तसेच यामधील मुख्य आरोपींचा सध्या शोध सुरु असल्याचं पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितलं आहे.