Jalgaon News : पारोळ्याच्या मेळाव्यात भेटला असाही शिवसैनिक...
एक हात मोडला, दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत, तोंड आणि डोक्याला खरचटलं.. अपघातानंतरही जखमी अवस्थेत शिवसेनेच्या मेळाव्याला हजर राहून दीपक पाटील या शिवसैनिकाने आपण उद्धव ठाकरे यांचे समर्थक असल्याचं दाखून दिले.
जळगाव : शिवसैनिक मेळाव्यासाठी दुचाकीवरुन निघाला.. मात्र रस्त्यातच त्याचा दुचाकीचा अपघात झाला...यात त्याचा हात मोडला तर दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत झाली, तोंडाला, डोक्यालाही खरचटलं... तरीही तशाच अवस्थेत हा शिवसैनिक मलमपट्टी करत थेट मेळाव्यात पोहोचला...हे कुठल्या सिनेमाचा कथानक नाही तर ही आहे खरीखुरी आणि प्रत्यक्षात घडलेली गोष्ट. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे असलेल्या या घटनेचा प्रत्यय आला. यातील शिवसैनिक तरुणाच्या धडपडीचं नेमक कारण म्हणजे... त्याला मेळाव्यात तो बंडखोरांच्या नव्हे तर आपले नेते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं तसेच मी खरा शिवसैनिक असल्याचं सिद्ध करायचं होतं.
शिवसेनेच एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांची बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे याच्यात शिवसेना विभागली गेली आहे. त्यामुळे नेमका कट्टर शिवसैनिक कोण असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच जळगावातील एका शिवसैनिकाने तो कट्टर शिवसैनिक असल्याचं एका घटनेतून दाखवून दिलं आहे.
तर घडलं असं काही.. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पारोळा शहरात शिवसेनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील दीपक राजेंद्र पाटील हा तरुण शिवसैनिक दुचाकीने पारोळ्याकडे येत होता. यादरम्यान कासोदा गावाजवळ दुचाकी घसरुन त्याचा अपघात झाला. यात एक हात मोडला तर दुसरा हाताला दुखापत झाली होती. तोंडाला तसेच चेहरऱ्यावर सुद्धा खरचटलं होतं. त्यानंतरही दीपक दवाखान्यात गेला, मलमपट्टी गेली आणि आपले उद्धव ठाकरेंना समर्थन आहे, आपण कट्टर शिवसैनिक आहोत, हे दाखवण्यासाठी, तसेच पारोळ्याचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांच्यासाठी तो आहे त्याच परिस्थितीत मेळाव्यात पोहोचला.
अपघानंतरही घरी न जाता मेळाव्याला का आला असं विचाल्यावर दीपक सांगतो की, "मी गेल्या सात ते आठ वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. हा अपघातच काय पण माझ्यावर असे कितीही संकट आलं तरी जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत मी शिवसेनेसोबत राहिल, असे तो ठामपणे सांगतो. तर बंडखोरी गेलेल्या आमदारांनी खूप चुकीचं केलं. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. शिवसेना ही फक्त बाळासाहेबांची आहे, ती कोणाच्या बापाची नाही, असेही तो बंडखोरांना उद्देशून म्हणाला.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेला खरा शिवसैनिक की, शिंदे यांच्यासोबत असलेला, शिवसेना शिंदेची की उद्धव ठाकरेंची असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र या सर्व प्रश्नांवर जळगावातील या शिवसैनिकाने चोख उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे एकाच पक्षाचे असतानाही समर्थन आणि विरोध अशा पद्धतीने भांडणाऱ्या शिवसैनिकांसमोरही या तरुणाने आदर्श उभा केला आहे, अस म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.