Raksha Bandhan Jalgaon News : बहिण ठाकरे गटात तर भाऊ शिंदे गटात; आमदार भावाने रांगेत उभं राहून बहिणीकडून बांधली राखी
Jalgaon News : राजकारणात कितीही वैर असले तरीही एखादी वेळ अशी येते की आपल्या रक्ताच्या नात्याला प्राधान्य द्यावंच लागतं.
जळगाव : राजकारण म्हटलं की कोण कुणाचा भाऊ नसतो, कोण कुणाची बहीण नसते. कधी काय होईल हे सांगता येणं अवघड असतं. मात्र एखादी वेळ अशी येते की आपल्या रक्ताच्या नात्याला प्राधान्य द्यावंच लागतं. मग राजकारणात कितीही वैर असले तरीही. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशातच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाचोरा येथील भाऊ बहीण एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आज उद्धव ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी यांनी राखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी रांगेत उभे राहून बहिणीकडून राखी बांधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले होते. आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या चुलत भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना मात्र आमदार किशोर पाटील यांचा निर्णय आवडला नसल्याने त्यांनी राजकारणात सक्रिय होत उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या सोबतच राहणे पसंत केले होते. भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे गटात राहिल्याने राजकारणात भाऊ विरुद्ध बहीण असे चित्र संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला होता.
त्यानंतर आज रक्षा बंधनाच्या RakshaBandhan) कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही बंधू भगिनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. आमदार किशोर पाटील हे आपल्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन दरवर्षी त्यांच्याकडून राखी बांधून घेत असतात. यंदा मात्र आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भगिनीकडून राखी बांधून घेण्यासाठी वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryvanshi) यांच्या घरी न जाता, वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिकरित्या घेतलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात इतर कार्यकर्त्यांप्रमाणे रांगेमध्ये उभ राहून आपल्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्या हातून राखी बांधून घेतली.
यावेळी दोन्ही बंधू आणि भगिनींनी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्या दिल्या आहे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात उभे असताना आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून राखी बांधून घेण्याची अनेक वर्षांची परंपरा आणि बंधू भगिनी प्रेम दाखविले असले तरी, सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी राखी बांधून घेतल्याने राजकिय क्षेत्रात मात्र हा चर्चेचा विषय बनला आहे. तसेच अशा निमित्ताने का होईना राजकारणातील रुसवा बाजूला सारून एकत्र आल्याने कार्यकर्त्यांना देखील हायसे वाटले.
इतर महत्वाची बातमी :