Jalgaon Bus Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Jalgaon Accident News : जालना जिल्ह्यातील बस अपघाताची घटना ताजी असतानाच जळगावमध्ये बसचा भीषण अपघात झालाय. यात एका महिला प्रवासीचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.
जळगाव : गुजरात राज्याकडून अकोला येथे जाणाऱ्या लक्झरी बसचा (Bus Accident) धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव (Jalgaon Accident News) येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुरत येथून लक्झरी बस एरंडोल मार्गे मलकापूर येथे जात होती. लक्झरी बसवर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते. धरणगाव तालुक्यातील वारडसिम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका साईडला झाल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले.
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली
यानंतर लक्झरी बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटली. या अपघातात एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. कविता सिद्धार्थ नरवाडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सोपान नारायण सपकाळ, विठ्ठल अमृत कोगदे, विश्वनाथ नामदेव वाघमारे, प्रशांत गजानन धांडे यांच्यासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले. जखमींना खासगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जालन्यातही भीषण अपघात
दरम्यान, जालना येथे देखील आज बसचा भीषण अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कोळेगाव घाटरस्ता चढताना बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Accident News : बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात बसमधील 2 प्रवासी जागीच ठार, 20 जखमी