Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात; टायर फुटून कार दुभाजकावर आदळली अन् क्षणार्धात पेटली, महिलेचा होरपळून मृत्यू
धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील चाकाचे भाग दूरपर्यंत उडाले आणि काही क्षणांतच इंजिन भागातून धूर निघू लागला. काही सेकंदांतच कारने पेट घेतला.

Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वाकोद गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात कारमध्ये लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. टायर फुटल्यामुळे भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की काही क्षणांत कारने पेट घेतला हे धक्कादायक दृश्य पाहून मोठी खळबळ उडाली. (Jalgaon Accident)
नेमकं घडलं काय?
जळगाव -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या कारचा अचानक टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि वाहन थेट दुभाजकावर आदळले. धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील चाकाचे भाग दूरपर्यंत उडाले आणि काही क्षणांतच इंजिन भागातून धूर निघू लागला. काही सेकंदांतच कारने पेट घेतला.
अपघातानंतर काही नागरिक त्वरित घटनास्थळी धावून आले. त्याचवेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी, तसेच जवळपासच्या भागातील रहिवाशी यांची मदत घेऊन पोलिसांनी कारचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी चालकाला गाडीमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र कारच्या मागील बाजूस बसलेली महिला गंभीररीत्या अडकली होती. पेट वाढत असल्याने दरवाजा किंवा काच फोडणे शक्य होत नव्हते. सूत्रांच्या माहितीनुसार, आगीचे प्रमाण काही मिनिटांतच वाढत गेले आणि मदतकार्य सुरू असतानाच महिलेला बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. कारच्या आगीतच महिलेचा मृत्यू झाला. कार जाळून खाक झाली आहे.
स्थानिकांची तातडीची मदत; पोलिसांचे प्रयत्न
अपघाताची माहिती मिळताच जामनेर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिकांनी पाण्याचा वापर केला. परंतु आग इतकी प्रचंड होती की कार पूर्णपणे जळून खाक झाली. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चालकाच्या जखमांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, जी काही काळानंतर पोलिसांनी सुरळीत केली.
























