Jalgaon News : गुलाबरावांविरुद्ध ठाकरे गटाचा मुंबईत एल्गार, मात्र जळगावात गुलाबराव समर्थकांकडून शोभायात्रेद्वारे स्वागत
Jalgaon News : गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर आज मुंबईतील शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एल्गार केला. तर दुसरीकडे जळगावातील फुफ नगरी गावाने गुलाबराव पाटील यांचं जंगी स्वागत करत गावभर मिरवणूक काढली.

Jalgaon News : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर आज मुंबईतील शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एल्गार केला. तर दुसरीकडे जळगावातील (Jalgaon) फुफ नगरी गावाने गुलाबराव पाटील यांचं जंगी स्वागत करत गावभर मिरवणूक काढली.
गुलाबरावांची शोभायात्रा
ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख त्यांनी नटी असा केला होता. त्यावरुन ठाकरे गटाच्या महिला आघाडीने गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. असं असलं तरी तिकडे जळगावात मात्र गुलाबरावांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील फुफ नगरी आणि परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलं. रविवारी (6 नोव्हेंबर) गुलाबराव पाटील यांची शोभायात्रा काढत सत्कार करण्यात आला.
लोकांच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर विराजमान
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, "निवडणूक काळात लोकांना आपण जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याचं आपलं काम आहे. त्यानुसार आपण या भागात विविध विकासकामांना निधी देऊन विकास योजना लोकार्पण केल्याने जनता आपल्या पाठीशी आहे. लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यानेच आपण मंत्री पदावर आहोत"
गुलाबरावांकडून सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख
दरम्यान, गुलाबराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र टीका करण्याच्या नादात गुलाबराव पाटील भलतंसलतं बोलत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विरोधक त्यांना चांगलंच घेरत आहेत. जळगावातील महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. वाळूचे ठेके, गावठी दारुचे अड्डे, तसेच दोन नंबरचा पैसा आहे असे गंभीर आरोप अंधारेंनी केले होते. या आरोपांना उत्तर देताना गुलाबरावांनी सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख केला होता. "मला माझा जिल्हा ओळखतो त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं", असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.
ठाकरे गट आक्रमक
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिलांनी एकत्र येत गुलाबराव पाटील यांचा निषेध केला. तसंच गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जळगावात ठाकरे गटाच्या महिलांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
