Girish Mahajan : शिक्षण संस्थेच्या वादामध्ये मला गोवण्याचा अनिल देशमुखांचा प्रयत्न होता; गिरीश महाजनांचा आरोप
Girish Mahajan : आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता, त्यामाध्यमातून फडणवीसांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होता असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
जळगाव : आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जळगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांवर दबाव आणला होता हे सत्य आहे, याबाबत स्वतः प्रवीण मुंढे (Pravin Mundhe IPS) यांनीही मला सांगितले होते अशी माहिती राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली. सूड बुद्धीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला यामध्ये गोवण्याचा अनिल देशमुख यांचा प्रयत्न होता असाही आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि जळगावच्या शिक्षणसंस्थेचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला राजकारणातून संपवण्याचा डाव होता
गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुखांनी पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचं पेन ड्राईव्हमध्येही उघडकीस आलं होतं. आता सीबीआय तपासामधूनही हे समोर आलं आहे. या सगळ्याचे मास्टर माईंड त्यावेळचे विशेष सरकारी वकील अॅड प्रवीण चव्हाण हे होते. कोणताही पुरावी नसताना तीन वर्षांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सगळ्याचा तपास आमचं सरकार आल्यावर सीबीआयने निष्पक्षपणे केला. त्यातून त्यावेळचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडेंचा जबाब समोर आला. काहीही करून गिरीश महाजन यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. कारण गिरीश महाजन संपले म्हणजे देवेंद्र फडणवीस संपले, आणि फडणवीस संपले म्हणजे भाजप संपली असा त्यांचा प्रयत्न होता. या सगळ्या गोष्टी पेन ड्राईव्हमधून समोर आल्या.
अजितदादांसोबत वाद झाला नाही
अजित पवारांसोबत निधी वाटपावरून कोणताही वाद झाला नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. ते म्हणाले की, अजितदादा आणि माझ्यामध्ये निधी वाटपावरून खडाजंगी झाल्याच्या बातम्या मी ऐकल्या आणि मला धक्का बसला. कारण असं काहीही घडलं नाही, हे सगळं काल्पनिक आहे. राज्यावर विविध योजनांमुळे ताण आहे हे सत्य आहे. त्यामुळे निधी देताना त्यांनाही ताळमेळ साधावा लागतो. आपल्याला निधी देताना तो पुढील काळात देता येईल. आता जो निधी आहे त्यात कपात करावी अशी त्यांनी अपेक्षा अजितदादांनी व्यक्त केली. ते त्यांच्या जागी योग्य आहेत. आमच्या भागाच्या विकासासाठी आम्ही मागणी केली हेही योग्य आहे. मात्र यामध्ये कोणताही वाद अथवा खडाजंगी झाली नाही.
काय आहे जळगावचं प्रकरण?
जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचा ताबा मिळवण्यावरुन गिरीश महाजन आणि संस्थेचे संचालक नरेंद्र भास्कर पाटील यांच्यात वाद झाला होता. संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी नरेंद्र पाटील यांचे बंधू विजय पाटील यांना गिरीश महाजन यांच्या लोकांनी 2018 मध्ये पुण्यात डांबून ठेवले आणि चाकूचा धाक दाखवला असा आरोप करण्यात आला.
गिरीश महाजन यांनी त्यावेळी व्हिडीओ कॉल करून विजय पाटील यांना धमकावले असा आरोप करण्यात आला . विजय पाटील यांच्या तक्रारीनंतर 2020 मध्ये जळगाव मधील निंभोरे पोलिस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीनवेळा फोन करून दबाव टाकल्याचा जबाब प्रवीण मुंढे यांनी आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला दिला.
ही बातमी वाचा: