![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Marathi Sahitya Sammelan : भविष्यातील एआय कट्ट्यात रोबोटिक कवींचा सहभाग; वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्यावरील परिसंवादात सूर
Marathi Sahitya Sammelan : आगामी 7-8 वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील, असा सूर वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य या परिसंवाद उमटला.
![Marathi Sahitya Sammelan : भविष्यातील एआय कट्ट्यात रोबोटिक कवींचा सहभाग; वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्यावरील परिसंवादात सूर 97th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Robotic Poets Participate in Future AI Katta Seminar on Marathi literature based on current technology Amalner Jalgaon Maharashtra Marathi News Marathi Sahitya Sammelan : भविष्यातील एआय कट्ट्यात रोबोटिक कवींचा सहभाग; वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्यावरील परिसंवादात सूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/ddbb3644c5ae67669a4da86b7da523871707049289953923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Sahitya Sammelan अमळनेर : आगामी 7-8 वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा (कृत्रिम बुद्धिमत्ता) असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील. भविष्यात सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. ज्यामुळे सामान्यांचे हित होत असेल त्यास साहित्य मानावे, असा सूर ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य' या परिसंवाद उमटला.
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (97th Akhil bhartiya Marathi Sahitya Sammelan) सभामंडप-2 कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य' या विषयावर परिसंवाद झाला. नॅशनल बूक ट्रस्ट अध्यक्ष मिलिंद मराठे अध्यक्षपदी होते. यात दीपक शिकारपूर (पुणे), नम्रता फलके (नागपूर), मिलिंद कीर्ती (दत्तवाडी), सागर जावडेकर (पणजी-गोवा), संदीप माळी (मुक्ताईनगर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला.
तंत्रज्ञान सर्वांकुंश झाले
अध्यक्षीय भाषणात मिलिंद मराठे म्हणाले की, तंत्रज्ञामुळे रोजगार निर्मिती होत आहे. जगाच्या सुरुवातीपासून नवीन तंत्रज्ञानाला विरोध करण्यात येतो. हा लढा सतत चालणारा आहे. तंत्रज्ञाचा वेग वाढला आहे. तंत्रज्ञान सर्वांकुंश झाले आहे. ऑडिओ बुक ऐकताना केवळ सुरातील चढ उताराकडे लक्ष दिले जाते. त्याच्या आशयाकडे नाही, असे स्पष्ट केले. माणसाचे मौलिक चिंतन जगातील कोणतेही डिव्हाईस करू शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर हितासाठी करण्यासाठी संस्काराशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरते. ज्याच्यामुळे सामन्यांचे हित होत असते त्यास साहित्य म्हणावे, असे मत त्यांनी मांडले.
भविष्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा असेल
दीपक शिकारपूर म्हणाले की, आयुष्यात ऐटीत जगायचे असेल तर आयटी वापरावे. इंटरनेट तंत्रज्ञानात रिचला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातून इतिहास व भूगोल जमा झाला आहे. लवकरच आभासी साहित्य संमेलन होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेटाव्हर्स हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. लॉकडाऊन काळात हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. आगामी 7-8 वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील, असा आशावाद मांडला.
डिजिटल मीडिया हे आता मेन स्ट्रीम
नम्रता फलके म्हणाले की, भारत स्वातंत्र झाला. यानंतर भारतात तंत्रज्ञान हळूहळू येत गेले. याचे चित्रण ग्रामीण कादंबरीत आले. ललित साहित्यात जयंत नारळीकर यांनी यंत्रमानव व मानव यांच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. आज पुस्तक चार फॉरमॅटमध्ये येते. जसे हार्ड, सॉफ्ट, ऑडिओ, व्हिज्वल आहे. अरुण काळे यांचा मागून आलेले लोक हा काव्यसंग्रह, राहुल बनसोडे यांनी भावनिक गुंतागुंत उलगडली आहे. पटेली यांनी ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून 1 हजार पुस्तकांची विक्री केली. डिजिटल मीडिया हे आता मेन स्ट्रीम झाले असल्याची भावना व्यक्त केली.
भारताचा पाचवी डिजिटल महासत्ता म्हणून उदय
मिलिंद कीर्ती म्हणाले की, भारताचा पाचवी डिजिटल महासत्ता म्हणून उदय होत आहे. मोबाईलचा वापर करणारे लोक हे लेखक बनले आहे. कोणीही लिहू शकतो, प्रसिद्ध करू शकतो. एआयमुळे यंत्रे बोलू व चालू लागली आहेत. ही यंत्रे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. ऑनलाईन खरेदीत डिस्काउंटच्या माध्यमातून वस्तुंच्या किमती कमी होत आहेत. मानवाची सृजनशीलता कमी होत आहे. तंत्रज्ञान मोफत मिळत असल्याने त्याची भुरळ पडली आहे. मात्र, एआय अणू बॉम्बपेक्षा अधिक विद्वंसक होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञानाचा वापर करा पण बुद्धिमत्ता गहाण टाकू नका
सागर जावडेकर म्हणाले की, भाषा हा एकमेकांना जोडणारा पूल आहे. अनेक क्षेत्रात वेबसाईट निर्माण होत आहे. आयटी क्षेत्र वरदान ठरत असताना त्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता ही वरदान नसून तिचा कमीत कमी वापर करण्यात यावा. तंत्रज्ञानाचा वापर करा पण बुद्धिमत्ता गहाण टाकू नका. आयटीमुळे शत्रू मित्र बनत आहे. बुद्धिमत्तेची कस लावायला विसरू नका असा सल्ला त्यांनी दिला.
पुस्तक प्रकाशनाचा खर्च झाला नगण्य
संदीप माळी म्हणाले की, तंत्रज्ञामुळे साहित्यात बदल होत आहे. वाचक, लेखक यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्रात आपले साहित्य छापून आणण्याचा विचार मागे पडत आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्याचा दर्जा त्याला मिळणाऱ्या कमेंट, लाईक, व्ह्यूव वरून ठरविले जात आहे. इ. बूक, ऑडिओ बुकद्वारा प्रकाशकांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. नवलेखकांना नवनवीन टेम्पलेट उपलब्ध आहेत. दुर्मिळ पुस्तक डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. पुस्तक प्रकाशनाचा खर्च नगण्य झाला असल्याचे मत मांडले.
आणखी वाचा
Marathi Sahitya Sammelan : मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध; डॉ. नीलम गोऱ्हेंची ग्वाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)