Wrestlers Protest: दिल्लीत आंदोलन करणारे पैलवान आणि पोलिस एकमेकांना भिडले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी केला आहे.
Wrestlers Protest: दिल्लीतल्या जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात धरणं आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत एका पैलवानाच्या कपाळावर मोठी जखम झाली असून त्याला दारुच्या नशेतील एका पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण केल्याचा आरोप पैलवानांनी केला आहे. आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी आंदोलनकर्त्या पैलवानांसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते. पण पोलिसांनी त्यास आक्षेप घेऊन पैलवानांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
#WATCH | Delhi: A scuffle breaks out between protesting wrestlers and Delhi Police at Jantar Mantar pic.twitter.com/gzPJiPYuUU
— ANI (@ANI) May 3, 2023
दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे पैलवानांसाठी बेड मागवण्यात आले होते. पण पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. त्यादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पैलवान बजरंग पुनिया आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दिल्ली पोलीस कर्मचारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यातील गोंधळाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आरोप केला आहे की पोलिसांनी त्या ठिकाणच्या पैलवानांना आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. कुस्तीपटूंच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
VIDEO | Ruckus between protesting wrestlers and Delhi Police at Jantar Mantar. More details are awaited. pic.twitter.com/AIS5zgH4My
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2023
कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा काही महिला पैलवानांनी आरोप केला आहे. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी यासाठी पैलवान दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
बृजभूषण सिंह यांची भूमिका
खासदार ब्रिजभूषण सिंह पैलवानांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी कोणती चूक केली आहे की त्यासाठी मी राजीनामा द्यावा? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर झाला आहे. आता तपास होऊ द्या. माझ्यावर कोणते आरोप आहेत हे मलाही माहित नाही. चार महिने विचार केल्यानंतर माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सात महिला कुस्तीपटूंनी केलेत लैंगिक छळाचे आरोप
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. एबीपी न्यूजला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत ब्रिज भूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना उत्तर देताना सांगितलं की, केवळ लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मी राजीनामा देणार नाही. मी कोणताही लैंगिक छळ केलेला नाही. ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंचं हे आंदोलन म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं असून आपण कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यास तयार असल्याचं सांगितलं.