(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट, 2019 मध्ये 56 लाख केस : WHO
WHO च्या जागतिक मलेरिया अहवालानुसार भारतातील मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की भारतात 2018 सालच्या तुलनेत 2019 साली 12 लाख मलेरियाचे रुग्ण कमी झाले आहेत.
नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असेलल्या देशांमध्ये भारताचा समावेश असतानाच देशातील मलेरिया रुग्णांमध्ये घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतात 2000 साली मलेरियाची रुग्णसंख्या 2 कोटी इतकी होती. आता त्यात लक्षणीय घट होऊन ती 56 लाखांवर पोहोचली आहे. सोमवारी (30 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या WHO च्या जागतिक मलेरिया अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
WHO ने आपला वार्षिक जागतिक मलेरिया अहवाल प्रकाशित केला. त्यात असं सांगण्यात आलंय की जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. अहवालात हेही सांगण्यात आलंय की 2018 सालच्या तुलनेत 2019 साली भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत 12 लाखांनी घट झाली आहे.
मलेरियामुळे या वर्षी चार लाख रुग्णांचा मृत्यू जागतिक मलेरिया अहवालाच्या मते यावर्षी जगात 2.29 कोटी मलेरियाच्या रुग्णांची भर पडली. गेले काही वर्ष या संख्येत बदल झाला नाही. मलेरियामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण 2018 साली 411,000 इतकं होतं तर 2019 साली ती संख्या 409,000 इतकी आहे.
WHO अहवालात असं सांगण्यात आलंय की आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतोय. त्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा पोहोचवण्यास मर्यादा येत असल्याने WHO ला आफ्रिकन देशांतील मलेरियाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं नाही. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा परिणाम मलेरियाच्या नियंत्रणाच्या प्रयत्नांवर होत आहे आणि त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
WHO चे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितलं की, "आफ्रिका आणि इतर देशांतील नेत्यांनी मलेरियाविरोधात पुन्हा एकदा उभं राहण्याची आवश्यकता आहे. जगातील देशांनी मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे."
भारतात जरी यावर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळालं असलं तरी गेल्या कित्येक दशकांपासून मलेरिया हे एक आव्हान म्हणून देशासमोर उभं आहे. भारताचा समावेश जगातील सर्वात जास्त मलेरियाच्या रुग्णांची संख्या असलेल्या देशांत होतो. आफ्रिका खंडाच्या बाहेरील देशांचा विचार करता जगाच्या तुलनेत भारतात मलेरियाची संख्या आणि त्यापासून होणाऱ्या मृत्यूची संख्या ही 70 टक्के इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या: