Who is Vijay Rupani : अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत विजय रूपाणी?
Who Is Vijay Rupani : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची माहिती समोर आली आहे.

Who Is Vijay Rupani : अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या AI171 या प्रवासी विमानाचा आज उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच अपघात झाला. अहमदाबादहून दुपारी 1:38 वाजता निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. विशेष बाब म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते. अद्याप त्यांच्या स्थितीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या अपघातामुळे विजय रुपाणी हे चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात विजय रुपाणी यांच्या विषयी...
कोण आहेत विजय रुपाणी?
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील यांगोन येथे झाला होता. त्यांची आई मायाबेन आणि वडील रमणिकलाल रूपाणी आहेत. सात भावंडांमध्ये विजय हे सर्वांत लहान आहेत. 1960 साली म्यानमारमध्ये सुरू झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचे कुटुंब राजकोट येथे स्थायिक झाले. गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठातून विजय रूपाणी यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांचा एक मुलगा इंजिनिअर आहे आणि एक मुलगी आहे, जिचे लग्न झाले आहे. त्यांचा दुसरा मुलगा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे.
2006 ते 2012 या काळात राज्यसभेचे सदस्य
विजय रूपाणी शिक्षण घेत असतानाच भाजपच्या विद्यार्थी संघटनेपासून म्हणजेच एबीव्हीपीपासून जोडले गेले. 1971 साली त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात ते 11 महिने तुरुंगात होते. 1996 ते 1997 या कालावधीत ते राजकोटचे महापौर होते. 1998 मध्ये त्यांची भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. 2006 मध्ये ते गुजरात टुरिझमचे चेअरमन झाले. 2006 ते 2012 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
2016 साली गुजरातचे मुख्यमंत्री
2013 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे चेअरमन म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये त्यांनी राजकोट वेस्ट मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्याच वर्षी आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले. 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2017 मध्ये भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आणि विजय रूपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यात आले. गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. हे आता त्यांच्या नावाचा बोर्डिंग पास समोर आल्यानंतर स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा























