Weather Update : तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर! धुके आणि बर्फवृष्टीने उत्तर भारत गारठला; आजचं हवामान कसं असेल?
IMD Weather Forecast : दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरु आहे, तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे.
Weather Update Today : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरसह पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात पारा घसरला आहे. दिल्लीत बुधवारी सकाळी पारा 22 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
उत्तर भारतात थंडीची लाट
डिसेंबर महिना संपत आला आहे आणि आता कुठे थंडीला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पारा घसरताना दिसत आहे. उत्तर भारतातील लोक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शीत लहरींमुळे काही राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज महाराष्ट्रात कोरडं वातावरण पाहायला मिळणार असून पारा घसरणार आहे.
तामिळनाडूत पावसाचा कहर
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरापासून तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाच्या मते, दक्षिण श्रीलंकेच्या किनार्याजवळ विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ आता कोमोरिन क्षेत्र आणि शेजारच्या परिसरात पोहोचलं आहे.
'या' भागात हाडं गोठवणारी थंडी
दिल्ली, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशासह देशातील अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी घट होईल, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. या राज्यांमध्ये जोरदार थंड वारे आणि धुक्याची चादर दिसेल. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये पुढील आठवड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील आठवड्यात या भागात दिवसभर हाडे गोठवणारी थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मैदानी भागात दाट धुके
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घसरण होईल. येत्या काही दिवसांत दिल्लीचे किमान तापमान 5 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील काही भागात किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवस हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात दाट धुके पाहायला मिळेल. तर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील मैदानी भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
कधी बर्फवृष्टी तर कधी पाऊस
कधी बर्फवृष्टी तर कधी पाऊस यामुळे हवामान सतत बदलताना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पर्वतीय भागात अनेक ठिकाणी नदी-नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. डोंगरात बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढत आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात बर्फाळ वाऱ्यांमुळे थंडी वाढत आहे.