एक्स्प्लोर
अभिनंदन पायलट आणि ज्योतिरादित्य! विजय मल्ल्याचं ट्वीट
राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसची विजयी पताका फडकावल्याबद्दल युवा नेते सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं विजय मल्ल्याने अभिनंदन केलं आहे.

मुंबई : भारतीय बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने केलेल्या ट्वीटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसची विजयी पताका फडकावल्याबद्दल युवा नेते सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं मल्ल्याने अभिनंदन केलं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर आहे. तर ज्योतिरादित्य यांचं नावही मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत होतं, मात्र राज्याची धुरा कमलनाथांच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मल्ल्याने केलेलं ट्वीट बुचकळ्यात टाकणारं आहे.
राजस्थानमध्ये पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सत्ता स्थापन केली, तर मध्य प्रदेशातही भाजपला कांटे की टक्कर देत काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही. मल्ल्याला या प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्यास 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अपील मान्य झाल्यास त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाला दिरंगाई होऊ शकते. विजय मल्ल्याने कर्ज फेडण्यासंदर्भात नुकताच बँकांसमोर नवीन प्रस्ताव ठेवला होता. आपण 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहोत, मात्र फक्त मुद्दलाची परतफेड करु शकतो, व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं होतं.Young Champions @SachinPilot and @JM_Scindia Many congratulations.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) December 13, 2018
आणखी वाचा























