CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर,भाजपनं पुन्हा जुना पॅटर्न वापरला, एनडीएचं संख्याबळ किती?
CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपनं एनडीएच्या उमदेवाराचं नाव जाहीर केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

CP Radhakrishnan नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा तडकाफडकी दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज जाहीर करायचा आहे. एनडीएनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. जेपी नड्डा यांनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित केली होती अशी माहिती दिली. जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, त्यांना प्रमोशन देत उपराष्ट्रपती पदावर भाजपनं संधी दिली होती. त्याच प्रमाणं सीपी राधाकृष्णन यांना राज्यपाल पदावर असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.
विरोधकांशी चर्चा करणार
भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील दिली. उमेदवाराची निवड सर्वांच्या संमतीनं केली जावी असा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. नड्डा म्हणाले की यापूर्वीच सांगितलं होतं त्याप्रमाणं आमचे वरिष्ठ नेते त्यांना भेटले होते आणि त्यांच्या संपर्कात आहेत.
सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूच्या तिरुप्पुरमध्ये झाला. सीपी राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. सीपी राधाकृष्णन म्हणजेच चंदरपुरम पोनुस्वामी भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी राजकारणातील सुरुवात आरएसएस आणि जनसंघाच्या माध्यमातून केली. ते 1998 आणि 1999 मध्ये कोइंबतूरचे खासदार होते. 2003 ते 2006 मध्ये तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष होते.
सीपी राधाकृष्णन फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 दरम्यान झारखंडचे राज्यपाल होते. मार्च ते जुलै 2024 दरम्यान त्यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार होता. याशिवाय त्यांनी मार्च ते ऑगस्ट 2024 दरम्यान पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारमधील हम पार्टीचे नेते जीतनराम मांझी यांनी देखील राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून एनडीएकडे 427 खासदार आहेत. तर, इंडिया आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 355 खासदार आहेत. लोकसभेत एनडीएकडे 293 आणि राज्यसभेत 134 खासदार आहेत. तर, इंडिया आघाडीकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 106 खासदार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी बहुमताचा आकडा 392 इतका आहे.
दरम्यान, सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होते ते पाहावं लागेल.
























