(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand Glacier Burst: जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, लष्कराकडून बचावकार्य सुरु
Uttarakhand Glacier Burst उत्तराखंडमधील जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्यामुळे पुन्हा एकदा हाहाकार माजला
Uttarakhand Glacier Burst उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे पुन्हा एकदा हिमकडा कोसळण्याची घटना घडली आहे. ज्यामुळं या भागात पुन्हा एकदा हाहाकार माजल्याचं चित्र आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर 291 लोकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं. सुमना भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीनंतर हा हिमकडा कोसळला. सदर दुर्घटनेमध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हिमकडा कोसळण्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय जिल्हा प्रशासन आणि बीआरओशी संपर्कात राहून मुख्यमंत्री घटनेचा आढावा घेत आहेत.
प्रकल्पांवरील कामं थांबवण्याचे आदेश
हिमकडा कोसळण्याच्या घटनेची सर्व माहिती मिळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. याशिवाय एनटीपीसी आणि तत्सम इतरही योजनांना रात्रीच्या वेळी सुरु असणाऱी सर्व कामं थांबवण्यासही सांगितलं आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. तीरथ सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही घटनेची चौकशी करत राज्याला शक्य त्या परीनं मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
291 persons have been rescued so far after a BRO Camp came under avalanche yesterday during heavy snowfall in Sumna area of Joshimath Sector in Chamoli district of Uttarakhand: Central Command, Indian Army pic.twitter.com/d4EkctICHI
— ANI (@ANI) April 24, 2021
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेकदा देशातील या भागात हिमकडा कोसळल्यामुळं मोठी संकटं ओढावली आहेत. त्यामुळं सदर घटना पाहता, यावेळी आणखी जीवित- वित्त हानी होणार नाही याकडेच बचावकार्यात सहभागी असणाऱ्या यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत.