(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttar Pradesh Assembly : यूपीमध्ये आज नवीन आमदारांचा शपथविधी सोहळा, योगी आदित्यनाथही आमदारकीची घेणार शपथ
उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आलेले आमदार आज शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आज आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.
Uttar Pradesh Assembly : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आलेले आमदार आज शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आज आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच आजपासूनच विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही सुरु होणार आहे. राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज आणि उद्या म्हणजे 28 आणि 29 मार्च रोजी होणार आहे. विधानसभेत सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा सुरु होईल. हंगामी सभापती रमापती शास्त्री हे आमदारांना शपथ देणार आहेत.
कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत?
राज्यातील 403 जागांपैकी भाजपला 255 जागा मिळाल्या आहेत. त्यांचा मित्रपक्ष अपना दल (सोनेलाल) ला 12 जागा आणि निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल (निषाद) याला सहा जागा मिळाल्या. राज्याच्या प्रमुख विरोधी समाजवादी पक्षाने 125 जागा जिंकल्या आहेत. ज्यामध्ये आघाडीच्या भागीदारांमधील आठ जागा राष्ट्रीय लोकदलाला आणि सहा जागा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला मिळाल्या आहेत.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक उद्या होणार
उत्तर प्रदेशच्या 18 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी 29 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीपकुमार दुबे यांनी शनिवारी ही माहिती दिली. दुबे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी 18 व्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी 29 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. 29 मार्च रोजी दुपारी तीन वाजता विधानसभेत निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सदस्याने शपथ घेणं बंधनकारक आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शनिवारी लखनौ येथील राजभवनात भाजपचे ज्येष्ठ आमदार रमापती शास्त्री यांना प्रोटेम स्पीकरपदाची शपथ दिली. गोंडा जिल्ह्यातील मानकापूर भागातून आठव्यांदा निवडून आलेले रमापती शास्त्री आमदारांना शपथ देतील. शास्त्री यांच्याशिवाय इतर चार जणांच्या पॅनलनेही शास्त्रींना मदत करण्याची शपथ घेतली.
विधानसभेचा अध्यक्ष कोण होऊ शकतो
विधानसभेत पूर्ण बहुमताच्या आधारे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यालाच विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार हे निश्चित झाले आहे. गेल्या 17 व्या विधानसभेत 403 जागांपैकी 325 जागा जिंकणाऱ्या भाजपचे हृदय नारायण दीक्षित विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपने दिक्षीत यांना उमेदवारी दिली नाही. भारतीय जनता पक्षात ज्येष्ठतेनुसार अनेक आमदार आहेत. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मात्र, कानपूर जिल्ह्यातील महाराजपूर विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा निवडून आलेले सतीश महाना यांना सभापती केले जाण्याची चिन्हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: