चीन आणि पाकिस्तानसोबत युध्द कधी करायचे याची तारीख मोदींनी ठरवली आहे: उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष
लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव असताना त्यांनी शुक्रवारी हे वादग्रस्त वक्तव्य केले.राम मंदिर आणि जम्मु काश्मिरच्या कलम 370 चा संदर्भ देत युध्दाचीही तारीख ठरली असल्याचं त्यांनी सांगितले.
बालिया: उत्तर प्रदेशचे राजकारणी आणि वादग्रस्त वक्तव्यांचा खूप जवळचा संबंध येतो. असेच एक वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंहानी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तान आणि चीनसोबत युध्द कधी करायचे आहे हे पंतप्रधान मोदींनी ठरवले आहे. यासंबंधी त्यांचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा संबंध राम मंदिर आणि जम्मु काश्मिरच्या कलम 370 यांच्याशी जोडला. या घटनांचा संदर्भ देऊन त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.
त्यांनी म्हटले आहे की राम मंदिर बांधणी आणि कलम 370 मध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला त्याप्रमाणेच पाकिस्तानशी आणि चीनशी कधी युध्द करायचे याची तारीख त्यांनी ठरवली आहे.
स्वतंत्र्यदेव सिंह हे 23 ऑक्टोबर रोजी भाजप आमदार संजय यादव यांच्या घरी बोलत होते. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांचा 'संबंधित तिथी तयार है' असे हिंदीत म्हणणारा व्हिडियो व्हायरल होत आहे.
याचबरोबर सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दहशतवादी असा उल्लेख केला आहे. याबााबत अधिक माहिती भाजप खासदार रविंद्र कुशवाह यांना विचारली असता त्यांनी भाजप कार्यकर्त्यात जोश निर्माण व्हावा म्हणून असा प्रकारचे वक्तव्य केले असावे असे सांगितले.
रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की लडाखच्या सीमेवर चीनसोबत सुरू असलेला तणाव भारताला संपवायचा आहे आणि या सीमेवर शांती राखायची आहे. पण हे करताना भारत आपल्या एक इंचही जमिनीशी जडजोड करणार नाही.