Underwater Metro: ऐतिहासिक क्षण... कोलकाता मेट्रोनं रचला इतिहास; देशात पहिल्यांदाच धावली 'अंडरवॉटर मेट्रो'
Underwater Metro: देशात प्रथमच कोलकाता मेट्रोनं नदीखाली बांधलेल्या बोगद्यातून मेट्रो ट्रेन चालवण्याचा इतिहास केला आहे. या अंडरवॉटर मेट्रोची चाचणी कोलकाता ते हुगळीच्या अंतर्गत हावडापर्यंत घेण्यात आली.
Underwater Metro: संपूर्ण देशभरात मेट्रोचं जाळं पसरत आहे. अशातच कोलकाता मेट्रोनं (Kolkata Metro) इतिहास रचला आहे. देशभरातील वाहतुकीसाठी प्रभावी ठरत असलेली मेट्रो देशात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोलकातामधील (Kolkata) ही अंडरवॉटर मेट्रोची चाचणी (Underwater Metro Test) केली जाणार होती. परंतु ही चाचणी अनपेक्षितपणे रद्द करण्यात आली होती. अखेर बुधवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.
बुधवारी इतिहास रचत कोलकाता मेट्रोनं देशात प्रथमच नदीखाली बांधलेल्या बोगद्यातून मेट्रोची चाचणी पूर्ण केली. हुगळीच्या अंतर्गत कोलकाता ते हावडा यादरम्यान करण्यात आलेल्या मेट्रोच्या ट्रायल रनमध्ये फक्त अधिकारी आणि अभियंतेच होते. यासंदर्भात माहिती देताना मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोलकाता आणि उपनगरातील लोकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी (P Uday Kumar Reddy) यांनी कोलकात्याच्या महाकरण स्थानकापासून (Mahakaran station) पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरवरील हावडा मैदान स्थानकापर्यंत (Howrah Maidan station) रेकमध्ये प्रवास केला.
कोलकाता मेट्रोनं घेतलेली ट्रायल रन एक 'ऐतिहासिक घटना' असल्याचं सांगताना रेड्डी म्हणाले की, हावडा मैदान आणि एस्प्लानेड स्टेशन दरम्यान पुढील सात महिन्यांपर्यंत ट्रायल रन घेतली जाईल. त्यानंतर या विभागात नियमित सेवा सुरू होईल. तसेच, अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भूगर्भ विभागाच्या 4.8 किमी लांबीची ट्रायल रन लवकरच सुरू होईल.
Kolkata Metro creates History!For the first time in India,a Metro rake ran under any river today!Regular trial runs from #HowrahMaidan to #Esplanade will start very soon. Shri P Uday Kumar Reddy,General Manager has described this run as a historic moment for the city of #Kolkata. pic.twitter.com/sA4Kqdvf0v
— Metro Rail Kolkata (@metrorailwaykol) April 12, 2023
भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन
कोलकाता मेट्रोचं हे सेक्शन सुरू झाल्यानंतर हावडा मैदान देशातील सर्वात खोल असलेलं मेट्रो स्टेशन म्हणून ओळखलं जाईल. हे मेट्रो स्टेशन पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे. कोलकाता मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोनं हुगळी नदीखालील 520 मीटरचा भाग 45 सेकंदात पार करणं अपेक्षित आहे. नदीखालील हा बोगदा पाण्याच्या पातळीपासून 32 मीटर खाली आहे.
'या' कारणामुळे प्रकल्पाला विलंब
हावडा मैदान आणि सॉल्ट लेकमधील माहिती तंत्रज्ञान हब सेक्टर V ला जोडणारा पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉर सियालदाह आणि सेक्टर V स्थानकांदरम्यान अंशतः कार्यरत आहे. मध्य कोलकात्याच्या बोऊबाजार भागात झालेल्या अपघातांमुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. 31 ऑगस्ट, 2019 रोजी, बोगदा बोरिंग मशीन (TBM) एका जलचराला आदळली, ज्यामुळे बोऊबझारमध्ये भूस्खलन आणि अनेक इमारती कोसळल्या आहेत.
पूर्वेकडील सियालदह बाजूकडून येणाऱ्या बोगद्यांमध्ये आणि पश्चिमेकडील एस्प्लानेड बाजूकडून येणाऱ्या बोगद्यांना जोडण्यासाठी काम सुरू असताना पाणी साचल्यानं अनेक घरांचं मे 2022 मध्ये पुन्हा नुकसान झालं होतं.
120 वर्ष सुरक्षित राहणार 'अंडरवॉटर बोगदा'
कोलकाताचा अंडरवॉटर बोगदा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आला आहे. पुढील तब्बल 120 वर्ष हा बोगदा जसाच्या तसा राहू शकतो, असं मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
नदीच्या बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही. बोगद्यांच्या काँक्रीटमध्ये हायड्रोफिलिक गास्केट आहे. बोगद्यांमध्ये पाणी आल्यास गास्केट उघडतील. जर बोगद्यात पाणी गेलंच तर त्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी टीबीएम पाणबुडीप्रमाणे काम करतील. पारंपारिक बोगद्याप्रमाणे, नदीचा बोगदा एकदा सुरू झाल्यावर बंद करता येत नाही.
नारळ फोडून पूजा करून चाचणी केली
जेव्हा मेट्रो हुगळी ओलांडली आणि पूर्व-पश्चिम मेट्रोच्या हावडा स्टेशनवर पोहोचली, तेव्हा मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) चे MD, HN जयस्वाल हे AFCON टीमसोबत उपस्थित होते. त्यानंतर पूजा आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. तिथून अधिकारी हावडा मैदान, 16.6 किमी पूर्व-पश्चिम कॉरिडॉरवरील टर्मिनल स्टेशनचा प्रवास पूर्ण करण्यासाठी मेट्रोमध्ये चढले. नंतर दुसऱ्या मेट्रोनंही हाच प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. पुढील काही महिन्यांत एस्प्लेनेड-हावडा मैदान विभागावर विस्तारित चाचण्यांमध्ये या दोन मेट्रोचा वापर केला जाईल. KMRC ने पाच ते सात महिन्यांत चाचण्या पूर्ण करणं आणि वर्षाच्या अखेरीस व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यासाठी सुरक्षा मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. बुधवारी सकाळी हुगळीचा पाच मिनिटांचा प्रवास ऐतिहासिक होता.