एक्स्प्लोर
नोटाबंदीविरोधात दिल्लीत दोनशे खासदारांचं धरणं आंदोलन

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या विरोधात संसद परिसरात विरोधक आज धरणं आंदोलन करणार आहेत. देशातील 13 पक्षांमधले जवळपास दोनशे खासदार गांधी पुतळ्यासमोर आज धरणं आंदोलन करतील. मोर्चाचं नियोजन करण्यासाठी काल विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसतर्फे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, जोतिरादित्य शिंदे सहभागी झाले होते. तर जेडीयू, राजद, तृणमुल, सपा, बसपा, सीपीएम, सीपीआय, डीएमके, राष्ट्रवादी, आप या पक्षांचे प्रतिनिधीही बैठकीला हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारीच नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला होता. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं आपल्याकडे काही जणांकडून समर्थन होत आहे. मात्र हे दुर्दैवी आहे, असं मोदी म्हणाले. नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला दाखल झालं होतं. त्यावेळी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं. ‘मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन, की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही. तुम्ही कितीही विरोध केलात, तरी तुम्हाला आमच्याबरोबरच यायचं आहे.’ असंही मोदी म्हणाले. शिवसेनेनं एकीकडे नोटाबंदीचं स्वागत केलं असलं तर दुसरीकडे चलनतुटवड्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. शिवसेना सत्तेत असतानाही तृणमूलने काढलेल्या नोटाबंदी विरोधातल्या मोर्चातही सहभागी झालेली पाहायला मिळाली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक























