Twitter Account : काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद
Twitter Account : ट्विटरने राहुल गांधी यांचे अकाऊंट निलंबित केल्यानंतर आता काँग्रेसचे अधिकृत अकाऊंट आणि काही महत्वाच्या नेत्यांचे अकाऊंट बंद केले आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने आता थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट आणि देशातील तसेच राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केलं आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, तेलंगणा काँग्रेस प्रभारी मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, हरीश रावत आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील ज्या बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता त्याच फोटोला काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी रीट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ट्विटरवर दबाव आणून, संबंधित बलात्कार पीडितेला न्याय न देता केंद्र सरकारने राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्याचा आरोप त्यांनी आपल्या ट्वीटमधून केला होता.
या प्रकरणी ट्विटरने खालील स्पष्टीकरण दिलं आहे,
ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं.
कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्वीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन पीडितेच्या पालकांची ओळख ट्विटवरुन जाहीर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आम्हाला कळवलं होतं. या गोष्टीमुळे कंपनीच्या नियमांचे आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ट्विटरने काही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
