(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Protest : अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते होणार सहभागी
अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Congress Protest Against Agnipath Scheme : केंद्र सरकारनं घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. देशभरात विविध ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरुन या योजनेचा विरोध करत आहेत. आता काँग्रेसनं देखील या योजनेच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आज रस्त्यावर उतरुन निषेध करण्यात येणार आहे. दरम्यान, या आंदोलनात पक्षाचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत.
अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते देशभरात सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत निदर्शने करणार आहेत. काँग्रेसचे हे देशव्यापी आंदोलन असणार आहे. तर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही अग्निपथ योजनेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचा देशव्यापी निषेध
अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे. याआधी रविवारी काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी अग्निपथ योजनेबाबत सरकारवर हल्ला चढवला होता. मोदी सरकार ही योजना आणून तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. सरकारनं ही नवीन योजना मागं घ्यावी, या मागणीचा काँग्रेस नेत्यांनी पुनरुच्चार केला. अग्निपथ योजनेच्या विरोधाचा सूर कमी होण्याऐवजी हळूहळू वाढत असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही प्रश्न उपस्थित केला
दरम्यान, मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अग्निपथ योजनेवर प्रश्न उपस्थित केला आहे. या चार वर्षांच्या योजनेमुळे लष्कर आणि तरुणांचा नाश होईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करावा. यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यानही सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारविरोधात वक्तव्य केली होती.
लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध वाढताना दिसत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. देशभरातील युवक रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत आहेत. यामध्ये काँग्रेस देखील सहभागी झाली आहे. काँग्रेसनंही या योजनेला मोठा विरोध केला आहे. दरम्यान, आता काँग्रेसनं या योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे.