एक्स्प्लोर
दूध न देणाऱ्या गायी भाजप नेत्यांच्या घरासमोर बांधा: लालू प्रसाद यादव

राजगीर (बिहार): राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'दूध न देणाऱ्या आणि वय झालेल्या गायी भाजप नेत्यांच्या घरासमोर बांधा. त्यानंतरच तुम्हाला कळेल की, भाजपचे नेते त्यांची योग्य देखभाल करु शकतात की, नाही.' असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टीका केली. ते बिहारमधील राजगीरमध्ये बोलत होते. 'गो-रक्षा याच्या नावाखाली भाजप नेते आणि आरएसएसशी संबंधित लोकं अल्पसंख्यांकांवर निशाणा साधत आहेत. हे सारं काही मतांसाठी सुरु आहे.' असा आरोप लालू प्रसाद यांनी केला. दरम्यान, यावेळी लालू प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. 'निवडणुकीपूर्वी 56 इंचांची छाती सांगणारे आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या मोदींनी याचंही उत्तर द्यायला हवं की, कशाप्रकारे पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांची हत्या करत आहेत.' 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांचे शिबिर बिहारमधील राजगीरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी लालू प्रसाद सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
आणखी वाचा























