Ayodhya Verdict | अयोध्या निकालावर भारतीयांच्या भूमिकेचं मोदींकडून कौतुक, राष्ट्र निर्मितीची आपली जबाबदारी वाढली
राम मंदिराचं निर्माण करण्याचं निर्णय आज सर्वोच्च न्यायाल्याने दिला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्र निर्मितीची आपली जबाबदारी वाढली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं
नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक केलं. भारताची लोकशाही मजबूत आहे, आज पुन्हा एकदा दिसून आलं. विविधतेत एकतेचा मंत्र उजळून निघाला आहे. 9 नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भारताची न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र असून कोणत्याही कठीण पेचप्रसंगावर कायद्याने तोडगा काढणं शक्य आहे, हे आज दिसून आलं, असं मोदींनी म्हटलं.
अयोध्या प्रकरणाला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जगात ओळख आहे, मात्र जगाने आज ते अनुभवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ज्या खुल्या मनाने सर्वांनी मान्य केला, यातून भारतीय संस्कृती झळकते. भारतातील विविधतेतील एकता आज जगाला दिसली आहे, असं मोदींनी म्हटलं.
राम मंदिराचं निर्माण करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायाल्याने दिला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्र निर्मितीची आपली जबाबदारी वाढली आहे. अयोध्या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. नव्या भारतात कटुता, भीतीला थारा नाही. आता नव्या पिढीने नव्या भारताची सुरुवात करावी, असं मोदी म्हणाले.
अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला असून सरकारने तीन महिन्यात मंदिर निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी ट्रस्ट बनवण्याबाबत देखील आदेश दिले आहेत.
अयोध्या खटल्याच्या निकालावर निर्णय देणाऱ्या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस धनंजय. वाय. चंद्रचूड, जस्टिस अशोक भूषण . जस्टिस एस अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टात 16 ऑक्टोबर 2019 रोजी अयोध्या खटल्यात सुनावणी पूर्ण झाली होती. सहा ऑगस्टपासून सलग 40 दिवस या प्रकरणी सुनावणी सुरु होती.
संबंधित बातम्या
- ऐतिहासिक निकाल, संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा
- AYODHYA VERDICT | दहा मुद्द्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण निकाल
- ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल सुनावणाऱ्या 'त्या' पाच न्यायमूर्तींच्या कारकिर्दीचा आढावा
- सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही; 5 एकरची भीक नको - ओवेसी