jammu kashmir News : काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर दहशतवाद्यांचा पोलीस हवालदारावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, नागरिकांची निदर्शने
दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केली. त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे.
Jammu kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताची हत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल भट असं या काश्मिरी पंडिताचं नाव आहे. दोन बंदूकधारी दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा परिसरातील तहसील कार्यालयात घुसले होते. यानंतर या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून राहुल भट यांची हत्या केली. त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. काश्मीर टायगर्स या अज्ञात संघटनेनं राहुल भट्ट यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.
सरकारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर गोळीबार करत हत्या केली आहे. दरम्यान, राहुल भट यांच्या हत्येचा विविध राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज दहशतवाद्यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर देखील गोळ्या झाडल्या ज्यात ते गंभीर जखमी झाले. रियाझच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सध्या रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच दहशतवादी हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद ठोकर हे त्यांच्या गुडुरा येथील घरी होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात रियाझ अहमद यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरु होती. छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच केंद्र सरकारवर अपयशाचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निदर्शने करण्यात आली.
दहशतवादी आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करत आहेत. यापूर्वी खोऱ्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हत्या केल्या होत्या, तशाच हत्या आता दहशतवादी करत असल्याचे दिसून येत आहे. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली. त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांना लक्ष्य करण्यात आले. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.