लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि 12 जणांचा दहशतवादी कृत्यात सहभाग, NIA चे नवीन आरोपपत्र दाखल
एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि अन्य 12 जणांविरुद्ध दहशतवादी कृत्यात सहभागी असल्यासंबंधी आरोपपत्र दाखल केलं आहे.
नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार आणि अन्य 12 जणांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी नवीन आरोपपत्र दाखल केले. या सर्वांवर दहशतवादी कारवायांत सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दहशत पसरवणे आणि हाय प्रोफाईल लोकांना लक्ष्य करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशात बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि इतर अनेक खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांशी या लोकांचे संबंध असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
या 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
या सर्व 14 आरोपींवर दहशतवाद पसरवण्याचा आणि सामाजिक आणि धार्मिक नेते, चित्रपट अभिनेते, गायक आणि व्यावसायिकांच्या हत्या घडवून आणण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच कॅनडा, नेपाळ आणि इतर देशांतील खलिस्तान समर्थक घटकांच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत दहशतवादी कारवायात सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार उर्फ सतविंदरजीत सिंग यांच्या व्यतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये जगदीप सिंग उर्फ जग्गू भगवानपुरिया, सचिन थापन उर्फ सचिन बिश्नोई, अनमोल बिश्नोई उर्फ भानू, विक्रमजीत सिंह उर्फ विक्रम ब्रार, संदीप झांझरिया उर्फ काला जथेरी, वीरेंद्र प्रताप सिंह उर्फ कला राणा, जोगिंदर सिंह, राजेश कुमार उर्फ राजू मोटा, राज कुमार उर्फ राजू बसो, अनाजी बसोली उर्फ राजू यादव आणि शाहबाज अन्सारी उर्फ शाहबाज यांचा समावेश आहे.
लॉरेन्स बिश्नोई याला 2015 साली अटक करण्यात आली आहे. परंतु तो तुरुंगातून त्याची गँग चालवतो. डेरा सच्चा सौदा'च्या अनुयायाच्या हत्येचा आरोपी असलेल्या कॅनडास्थित गोल्डी ब्रारसह वेगवेगळ्या राज्यांतील तुरुंगांमधून त्याचे गुंड सिंडिकेट चालवत आहे. लॉरेन्स बिश्नोई याचा पंजाब राज्य गुप्तचर मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात हात होता, आरपीजी हल्ल्याच्या प्रकरणासाठी मारेकरी पुरवण्यामध्ये त्याचा हात होता. लॉरेन्स बिश्नोई याने हे सर्व बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या हरविंदर सिंग उर्फ रिंडा या दहशतवाद्याच्या निर्देशानुसार केलं होतं.
गोल्डी ब्रारचे दहशतवादी लखबीर सिंग उर्फ लंडा यांच्याशी थेट संबंध असल्याचे आढळून आले. तो रिंडासोबत जवळून काम करणारा बीकेआय ऑपरेटर आहे. लंडा हा मोहाली आरपीजी हल्ल्याचा तसेच पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील सिरहाली पोलीस स्टेशनवर डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या आरपीजी हल्ल्याचा आरोपी आहे.
एनआयएने या प्रकरणी यापूर्वी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये 74 ठिकाणी छापेमारी करुन नऊ बेकायदेशीर आणि अत्याधुनिक शस्त्रे, 14 मॅगझिन, 298 राऊंड दारूगोळा आणि 183 डिजिटल उपकरणे आणि इतर गुन्हेगार साहित्य जप्त केले आहे.