Teesta Setalvad Case : तिस्ता सेटलवाड प्रकरण: भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Teesta Setalvad Case Congress BJP : गुजरात दंगलीनंतर गुजरास सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल आणि तिस्ता सेटलवाड यांच्यावर करण्यात आला. त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
Teesta Setalvad Case Congress BJP : गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) केल्यानंतर आता त्याचे अपेक्षेप्रमाणे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. काँग्रेसने तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट आखला होता. आता हे सत्य समोर आले असल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले. तर, मुख्यमंत्री असताना झालेल्या दंगलीच्या पापातून मुक्त होण्यासाठी निराधार आरोप दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर लावण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले.
भाजपचा सोनिया गांधीवर आरोप
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, अहमद पटेल तर एक नाव आहे. या सगळ्यामागे सोनिया गांधी यांचा सहभाग आहे. आपले राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या मार्फत सोनिया गांधी गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. त्यातून नरेंद्र मोदी यांची बदनामी केली. त्यांचा सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला होता. आता सत्य बाहेर येत असल्याचे पात्रा यांनी म्हटले. तिस्ता सेटलवाड यांना 30 लाख रुपये देखील सोनिया गांधी यांनीच अहमद पटेल यांच्या मार्फत दिले होते असा आरोप करत यानंतरही न जाणो किती कोटी रुपये दिले असतील असा प्रश्न पात्रा यांनी दिला.
काँग्रेसचा पलटवार
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपवर हल्लाबोल केला. एसआयटी मालकाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला. एका मुख्यमंत्र्याला 'क्लिन चीट' दिल्यानंतर माजी एसआयटी प्रमुखाला कशाप्रकारे बक्षिसी मिळाली होती, हे सगळ्यांना ठाऊक असल्याचे रमेश यांनी म्हटले. कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांना माध्यमांच्या मार्फत लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांना तथाकथित निष्कर्ष म्हणून कसे प्रसारीत करणे, त्यांचा प्रचार करणे हे मोदी-शाह जोडीची कामाची पद्धत असल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले की, गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आली भाजप नवीन थेरी घेऊन येते. मागील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, एका डिनरची चर्चा सुरू करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानच्या मदतीने मोदींविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर भाजपने आरोप केले होते. निवडणूक संपल्यानंतर भाजपला संसदेत डॉ. मनमोहन सिंह यांची माफी मागावी लागली होती, याची आठवण खेरा यांनी करून दिली. सत्तेच्या दरम्यान केलेल्या कामावर मते मागू शकत नाही. हे अपशय झाकण्यासाठी भाजपकडून विविध थेरी रचली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एसआयटीने काय म्हटले?
एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अहमदाबाद येथील शाहीबागमधील सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत अहमद पटेल यांनी सेटलवाड यांना 25 लाख रुपये दिले. हा निधी गुजरात मदत कार्याच्या नावाने घेण्यात आला होता. या बैठकीत काही राजकीय नेते उपस्थित होते. त्याशिवाय, गुजरातमध्ये गोध्रा येथील रेल्वेजळीत कांड घडल्यानंतर सेटलवाड यांनी एका आठवड्यात मदत शिबिराचा दौरा केला आणि राजकीय नेत्यांसोबत बैठका घेतल्या. दंगलीच्या चार महिन्यानंतर गुप्त पद्धतीने त्यांनी तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत दिल्लीत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.