TATA Group 'No Limit' Help : कोरोनाच्या संकटात मदतीसाठी टाटा समूहाचा पुढाकार, 'नो लिमिट' योजनेअंतर्गत 2000 कोटींची गुंतवणूक
टाटा समूहातील कंपन्या कोविड-19 च्या संकटात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. 'नो लिमिट' या टाटाच्या योजनेअंतर्गत तब्बल 2000 कोटी रुपयांची मोठी रक्कम टाटा समूह आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी खर्च करणार आहे.
मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाची साथ देशभरात वाढतेय, कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हायचं नाव घेत नाहीय. अशात देशातील आरोग्य यंत्रणा कमकुवत पडतेय. पण कोरोनाच्या या महामारीला लढा देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा त्यांच्या परीने खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहे, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील.
टाटा समूहाच्या या कोविड क्रिटिकल केअर इन्फ्रास्ट्रक्चरची वैद्यकीय यंत्रणा मजबूत होण्यास मदत होईल. केवळ सरकारी रुग्णालयांवर रुग्णांचा व इतर गोष्टींचा भार येणार नाही. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे.
इकोनॉमिक टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार टाटा समूह या योजनेसाठी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात टाटा समूहाची जो नफा झाला त्याच रकमेतून दे 2000 कोटी रुपये टाटा समूह गुंतवत असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर आता टाटा समूह लस उत्पादक कंपन्यांसोबतही करार करण्याचा विचार करत आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अॅंड एअरोस्पेस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला यांनी इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स, टाटा मोटर्स, भारतीय हॉटेल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास आणि टाटा प्रोजेक्ट्स अशा सर्व टाटाच्या कंपन्या कोरोनाच्या या संकटात देशाला मदत करण्यासाठी आपापल्या परीने काही रक्कम देत आहे. यापैकी काही कंपन्यांनी कोरोनाच्या उपचारांसाठी लागणारी महत्त्वाची उपकरणं खरेदी करण्यासाठी गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटातही अनेकांना मदत केली होती.
रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन आणि लसीच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी टाटाच्या प्रत्येक कंपनीतून एक टीम तयार केली गेली आहे. टाटा ट्रस्टने वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने आरोग्य सेवा प्रशिक्षणाचे शिबीरदेखील सुरू केले आहेत.
इंडियन हॉटेल्स, जिंजर आणि प्रेसिडेंट ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी वैद्यकीय देखरेखीसाठी 1400 बेड दिले आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना या बेड्सवरून तातडीने रुग्णालयात हलवण्यात येईल. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब मदतीसाठी टाटा कंपनीने हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल्सची देखील देखरेख केली आहे, जेणेकरून रुग्णालयात अडचण झाल्यास रुग्ण या हॉटेल्समध्ये राहू शकतील.
रतन टाटा हे नेहमीच संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येतात, टाटा समूह हा नेहमीच अशा मोठ्या संकटवेळी संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी तत्पर असतो, कोरोनाचं संकट ओढवल्यापासून रतन टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात कायम पोहोचेल याची काळजी घेतली आहे. आता टाटाने आखलेल्या या 'नो लिमिट' योजनेचा गरजूंना मोठा आधार मिळणार आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )