Tamil Nadu Heavy Rain : तामिळनाडूत पावसाची धुवांधार बँटिंग; IMD कडून 'रेड अलर्ट' जारी
Tamil Nadu Heavy Rain : मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Heavy Rain in Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आयएमडीनं येणाऱ्या दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागांत 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
आयएमडीकडून रेड अलर्ट जारी
हवामान विगानं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आयएमडीनं रेड अलर्ट जारी केला आहे.
लो प्रेशर सिस्टममुळं मुसळधार पावसाची शक्यता
शनिवारी रात्रभर मुसळधार पावसामुळं चेन्नई आणि लगतच्या उपनगरांत पाणी साचलं आहे. सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचं म्हणणं आहे की, लो प्रेशर सिस्टम तयार झाल्यामुळं आणखी काही दिवस मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
आयएमडीनं अंदाज वर्तवला आहे की, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं पुढिल 48 तासांत चक्रीवादळ सदृश परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबरच्या दरम्यान ते चक्रिवादळ उत्तर तामिळनाडूच्या किनार्याकडे सरकेल. ज्यामुळे 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी लगतच्या भागांत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी दौरा
मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मुख्य सचिव व्ही. इराई अंबू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री स्टालिन यांनी दिले. कॅबिनेट मंत्र्यासह स्टालिन यांनी पूराने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी तांदूळ, दूध, चादर आदी मदत वितरीत केली.
आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितले की, चेन्नईमध्ये शनिवार रात्रीपासून 12 तासांमध्ये 20 सेमी इतका पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, चेन्नई आणि उपनगरात 10 सेमी ते 23 सेमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तामिळनाडू सचिवालयाजवळील कामराजार सलाइ बिंदू (मरिना बीचजवळील डीजीपी कार्यालय) येथे सर्वाधिक 23 सेमी आणि उत्तर चेन्नईच्या उपनगरातील एन्नोरमध्ये 10 सेमी पावसाची नोंद करण्यात आली.