एक्स्प्लोर
काँग्रेस अध्यक्षपदाची माळ सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात पडण्याची शक्यता
दलित चेहरा आणि गांधी परिवाराप्रती निष्ठा सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे घेऊन गेली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदाची माळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. शिंदे हे गांधी परिवाराच्या मर्जीतले सहकारी मानले जातात. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदे यांचेच नाव आघाडीवर आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी पदावर कायम राहावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले मात्र तरीही राहुल आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
दरम्यान, आता काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं नाव आहे. गांधी परिवाराच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्यावरच विश्वास ठेवला जाईल अशी चर्चा आहे. मात्र पक्षात दुसरा एक गट असा आहे जो शिंदे यांच्या नावाला विरोध देखील करत आहे. काँग्रेस सत्तेत असताना जयपूरच्या अधिवेशनात सुशीलकुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' चा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे पक्षाला मोठे नुकसान झाले होते.
काँग्रेस पक्षाची अँटी हिंदू अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये देखील सुशीलकुमार शिंदे यांचे नाव नेहमीच पुढे येते. शिंदे यांनी याचे वेळोवेळी समर्थन देखील केले आहे. शिंदे यांनी देशाचे गृहमंत्री असताना कसाब आणि अफजल गुरु सारख्या दहशतवाद्यांना फाशी देखील दिली होती.
शिंदे यांच्याबद्दल पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांना पक्षाचे महासचिव करत हिमाचल प्रदेशचे प्रभारी बनवले होते, त्यावेळी शिंदे यांनी सोनिया गांधी यांना सांगा, मला चार लोकसभा जागा असलेल्या राज्यांचे नेतृत्व नको तर मोठ्या राज्याच्या प्रभार द्या, असं म्हटलं होतं. मात्र जेव्हा सोनिया गांधी यांच्या समोर हा विषय छेडलं गेला त्यावेळी त्यांनी हसून, हात जोडत ही जबाबदारी स्वीकारली होती.
दलित चेहरा आणि गांधी परिवाराप्रती निष्ठा सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे घेऊन गेली आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा आता मागे घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचं सत्र सुरु झालं आहे. नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस सभेचा राजीनामा दिला आहे. तर नितीन राऊत यांनीही अनुसुचित जाती सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकारी राजीनामे देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी काल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषण देखील केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं हे सांगून आपली निष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे.
तर शिंदे होतील चौथे महाराष्ट्रीय
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1900 मध्ये नारायण गणेश चंदावरकर यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली होती. तर गोपालकृष्ण गोखले हे 1905 साली तर रघुनाथ मुधोळकर हे 1912 साली काँग्रेस अध्यक्ष झाले होते. त्यानंतर महाराष्ट्राला सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने चौथा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? सस्पेन्स संपेना, राहुल गांधींसाठी निष्ठावानांकडून प्रयत्न सुरुच
कुठल्याही स्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधींची बैठक, नाना पटोले यांचा राजीनामा
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड निश्चित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement