एक्स्प्लोर
पट्टेवाला ते फौजदार ते केंद्रीय गृहमंत्री, सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष होणार?
काँग्रेसमध्ये ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटातल्या नावांची चर्चा अध्यक्षपदासाठी सुरु आहे. ज्येष्ठांमधून सुशीलकुमार शिंदे तर युवा गटातून सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली : तब्बल 21 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष मिळणार हे आता जवळपास नक्की आहे. विशेष म्हणजे हा मान एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. कारण राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या नावामागे नेमकी काय काय गणितं असू शकतात यावर एक नजर टाकुयात.
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचा शोध महाराष्ट्रापाशी येऊन थांबणार का, हे पद पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीला मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या राजधानी दिल्लीत रंगली आहे. कारण अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं. गांधी घराण्याचा सर्वात विश्वासू माणूस या निकषात सुशीलकुमार अगदी फिट बसतातच. पण इतरही अनेक गणितं त्यांच्या नावामागे असू शकतात.
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. सध्या दलित व्होटबँक काँग्रेसपासून दुरावली आहे. यूपीमध्ये मायावती, महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नवे वाटेकरी निर्माण झाल्याने काँग्रेस या महत्त्वाच्या राज्यात आपला बेस गमावून बसली आहे. त्यामुळे दलित अध्यक्ष देऊन काँग्रेस एका मोठ्या वर्गाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही दलित नेते सध्या काँग्रेस हायकमांडच्या जवळचे मानले जातात. पण केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव, महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं असल्यानं शिंदे खरगेंपेक्षा सरस मानले जातात.
काँग्रेसमध्ये ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटातल्या नावांची चर्चा अध्यक्षपदासाठी सुरु आहे. ज्येष्ठांमधून सुशीलकुमार शिंदे तर युवा गटातून सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावल्यावरच याबाबत स्पष्टता येईल असं सूत्र सांगतात.
शिंदे हे हायकमांडच्या सर्वात विश्वासातले आहेत. त्यांच्या एकनिष्ठतेबद्दल प्रश्नच नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नेतृत्वात 2004 ला निवडणुका जिंकल्या, पण निवडून आल्यानंतर शिंदेंना त्याचं बक्षीस मिळालं नव्हतं. यूपीएच्या काळात गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांच्याच काळात कसाब, अफझल गुरुला फाशी दिली गेली. पण दुसरीकडे जयपूर अधिवेशनात त्यांनीच हिंदू दहशतवाद या शब्दाचा पहिला वापर केला आणि पक्षाची प्रतिमा हिंदूविरोधी बनत गेली, असा काँग्रेसच्या एका गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे हे जुने वाद उकरण्याची संधी त्यांच्या निमित्ताने भाजपला मिळेल असाही दावा काही जण करत आहेत.
हायकमांड देईल ती जबाबदारी शिंदे आजवर हसतमुखाने स्वीकारत आले आहेत. कधी त्यांना राज्यपालपद दिलं गेलं, कधी हिमाचल प्रदेशसारख्या छोट्या राज्याचं प्रभारीपद. एक पट्टेवाला ते देशाचा गृहमंत्री असा स्वप्नवत प्रवास शिंदेंनी केला आहे. अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं, तर त्यांच्या या प्रवासात आणखी एक सुवर्णपान जोडलं जाईल. मराठी व्यक्तीकडे काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे हा योग खरोखर जुळून येणार का, आणि जशी चर्चा सुरु आहे तसं खरंच शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का याची उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement