एक्स्प्लोर
सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी जनतेचं, कुठल्याही एका पक्षाचं नाही : पर्रिकर
नवी मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी भारतीय जनतेला जातं, कुणा एका राजकीय पक्षाला याचं श्रेय जात नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले. नवी मुंबईतील एका परिषदेच्या उद्घाटनादरम्यानच्या भाषणात पर्रिकर बोलत होते.
"सध्या सर्जिकल स्ट्राईकच्या श्रेयावरुन वाद सुरु आहे. पण मला इथे आवर्जून सांगावासं वाटतं की, सर्जिकल स्ट्राईकचं संपूर्ण श्रेय देशातील 127 कोटी जनतेला जातं. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय जात नाही. मात्र, सर्जिकल स्ट्राईकच्या एकंदरीत निर्णय प्रक्रियेतील भाग म्हणून पंतप्रधान मोदी आणि मलाही यातलं थोडं श्रेय जातं.", असे संरक्षमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले.
यावेळी, राजकारण आणि सैन्याची प्रकरणं यांची सरमिसळ करु नये, असे सांगताना पर्रिकर असेही म्हणाले की, लोकांचं सर्जिकल स्ट्राईकबाबत भावनिक प्रतिक्रिया समजू शकतो.
"सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री झोपलोही नव्हतो"
"लोकांमधील राग वाढताना दिसत होता. कारण शत्रू वारंवार हल्ले करत आहेत. लोकांमध्ये निराशेची भावना होती, लोक हताश होते. मात्र, सर्जिकल स्ट्राईकमुळे लोकांना एकप्रकारे समाधान मिळालंय. सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, सरकार निर्णय घेतं. सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री मी झोपलोही नव्हतो. प्रचंड तणाव होता.", असे पर्रिकर म्हणाले.
"...तर संपूर्ण जबाबदारी सरकारवर आली असती"
"सर्जिकल स्ट्राईकमध्ये कुठलीही चूक झाली असती तर पूर्ण जबाबदारी सरकारवर आली असती. त्यामुळे असे निर्णय घेण्यासाठी हिंमत असावी लागते. आमच्या मैत्रीला कमजोरी समजलं गेलं. आता ते गोंधळात आहेत. कारण भारताबद्दल अंदाजही लावू शकत नाहीत. शिवाय भविष्यात परत हिंमतही ते करु शकत नाहीत.", असे पर्रिकर म्हणाले.
"29 सप्टेंबरसारखा सर्जिकल स्ट्राईक यापूर्वी झाला नव्हता"
यूपीएच्या कार्यकाळात एलओसीपलिकडे सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या काँग्रेसच्या दाव्याचं खंडन करत पर्रिकर म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे यूपीएच्या काळात असं कोणतंही ऑपरेशन झालं नव्हतं. शिवाय, 29 सप्टेंबरसारखा सर्जिकल स्ट्राईक यापूर्वी कधीही झाला नव्हता. 29 सप्टेंबरचा सर्जिकल स्ट्राईक हा पूर्णपणे सरकारचा निर्णय होता."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement