ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना
ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं नॅशनल टास्क फोर्सच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. राज्यांना असणारी ऑक्सिजनची गरज-पुरवठा यातल्या समन्वयासाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे. एकूण 12 सदस्यांत वेगवेगळ्या मेडिकल संस्थांवरचे तज्ञ, आरोग्य मंत्रालयातल्या सचिवांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश असणार आहे.
टास्क फोर्समधील सदस्य
1. डॉक्टर भबतोष विश्वास, कोलकाता येथील पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू
2. डॉक्टर देवेंद्र सिंह राणा, अध्यक्ष, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली.
3. डॉ. देवी प्रसाद शेट्टी, चेअरपर्सन आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बेंगलुरू
4. डॉक्टर गगनदीप कांग, प्रोफेसर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू.
5. डॉक्टर जे व्ही पीटर, संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू.
6. डॉक्टर नरेश त्रेहान, व व्यवस्थापकीय संचालक, मेदांता रुग्णालय व हृदय संस्था गुरुग्राम.
7. डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल केअर मेडिसिन आणि आयसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड (मुंबई) आणि कल्याण (महाराष्ट्र).
8. डॉक्टर सौमित्र रावत, अध्यक्ष आणि प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली.
9. डॉक्टर शिवकुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, डायरेक्टर, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्स (ILBS), दिल्ली.
10. डॉक्टर झरीर एफ. उदवाडिया, कन्सल्टंट चेस्ट फिजीशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारशी जनरल हॉस्पिटल, मुंबई.
11. सचिव, भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय.
नॅशनल टास्क फोर्सचे संयोजक देखील याचे सदस्य असतील, जे केंद्र सरकारमधील कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकारी असतील. आवश्यक असल्यास, कॅबिनेट सचिव सहाय्यक नियुक्त करू शकतात. मात्र, अतिरिक्त सचिवाच्या पदाच्या खाली असलेल्या अधिकाऱ्यास नियुक्त करता येणार नाही.
24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचीच संख्या केवळ वाढत नाही तर आता मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 4 लाख 01 हजार 078 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4 हजार 187 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 3 लाख 18 हजार 609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
7 मे पर्यंत देशभरात 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर काल 22 लाख 97 हजार 257 जणांना लस दिली. आतापर्यंत एकूण 30 कोटी 4 लाखांपेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी केली असून काल 18 लाख नमुने घेण्यात आले, ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.