(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अयोध्या प्रकरण सुनावणीचा मार्ग मोकळा, 29 ऑक्टोबरपासून नियमित सुनावणीची शक्यता
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं 2:1 असा हा निर्णय दिला.
नवी दिल्ली : अयोध्या वादग्रस्त जागेच्या निर्णयाची नियमीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. मशिदीत नमाज पठण करणं हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही, याबाबत 1994च्या सर्वोच्च न्यायालयाच्याच निर्णयाचं पुनरावलोकन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वरिष्ठ घटनापीठाकडे जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
अयोध्या वादग्रस्त जागेच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा पुढे आला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं 2:1 असा हा निर्णय दिला. अयोध्या वादग्रस्त जागेच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर पासून होणार आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं की, "1994मध्ये पाच न्यायधीशांच्या घटनापीठानं दिलेला निर्णयावेळी काय परिस्थिती होती. प्रत्येक निर्णयासाठी परिस्थिती वेगवेगळी असते. प्रकरणाच्या निकालासाठी मागील काही निर्णय समजून घेणं गरजेचं आहे."
मात्र न्यायमूर्ती एस. अब्दुल यांनी घटनापीठाच्या इतर दोन सदस्यांना निर्णयाच्या वेगळं मत माडलं आहे. त्यांनी म्हटलं की, "मशिद इस्लामचा अविभाज्य भाग आहे. या विषयावरील निर्णय धार्मिक भावना लक्षात घेऊन दिला गेला पाहिजे. यावर गंभीर विचार करणे गरजेचं आहे."
सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्टोबरला निवृत्त होत असल्याने नवीन तीन सदस्यीय घटनापीठ स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्टोबरला नवीन घटनापीठ करणार आहे.