West Bengal News : धक्कादायक! महागड्या आयफोनमधून इन्स्टा Reels बनवण्यासाठी एका जोडप्याने चक्क 8 महिन्यांच्या बाळाला विकलं
West Bengal Couple Sells their 8 month old Baby : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
West Bengal Couple Sells their 8 month old Baby : आर्थिक संकटाच्या काळात गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतल्याचे किंवा काही मौल्यवान वस्तू विकल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण एका जोडप्याने अॅपल आयफोन (iPhone) घेण्यासाठी चक्क आपल्या बाळाला विकलं हे ऐकून आश्चर्य वाटेल. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील आहे. या ठिकाणी एका जोडप्याने इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) बनवता यावेत यासाठी हद्दच पार केली. iPhone 14 खरेदी करण्यासाठी पती-पत्नीने आपल्या निष्पाप बाळाला विकले आहे.
असे उघडले गुपित, शेजाऱ्यांना आला संशय
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेचा तपास घेताना पश्चिम बंगाल पोलिसांना बाळाच्या आईला पकडण्यात यश आले आहे. मात्र, वडील जयदेव घोष अद्याप फरार असून अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. जयदेव घोष यांच्या कुटुंबियांच्या वागण्यात काही विचित्र बदल संबंधित शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. आठ महिन्यांचे बाळ अनेक दिवसांपासून बेपत्ता होते, तरीही पालकांनी काळजी किंवा घाबरण्याचे कोणतीही हालचाल दाखवली नाही. तसेच त्यांच्या हातात आयफोन 14 पाहून शेजाऱ्यांमध्ये संशय जास्तच वाढला. कारण त्या iPhone 14 ची किंमत साधारण एक लाखांच्या जवळपास होती. शेजाऱ्यांना या जोडप्याच्या आर्थिक परिस्थितीची आधीच कल्पना होती. अशा परिस्थितीत अचानक iPhone 14 विकत घेणं कसं परवडलं याबाबत त्यांच्या मनात शंका आली.
सर्वात आधी सात वर्षांच्या मुलीला विकायचं होतं
संबंधित घटनेच्या संदर्भात बाळाच्या आईशी संवाद साधल्यावर, तिने शेवटी कबुली दिली की तिने आणि तिच्या पतीने आयफोन विकत घेण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी आपले बाळ विकले होते. तिने सांगितले की, ते या आयफोनवरून इंस्टाग्राम रील्स बनवत होते. ज्यामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा प्रवास दाखविण्यात आला होता. याहूनही धक्कादायक बाब समोर आली आहे की, आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी वडिलांनी आपल्या सात वर्षांच्या मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळाला विकत घेणाऱ्या आईवरही मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अद्याप सुरू असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास घेत आहेत.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
दुर्दैवाने ही घटना काही पहिली नाही. भारतात आणि जगात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे पालकांनी भौतिक सुखासाठी आपल्या मुलांना विकण्याचा प्रयत्न केला आहे. 2016 मध्ये, एका चिनी जोडप्याने आयफोन खरेदी करण्यासाठी त्यांच्या 18 दिवसांच्या मुलीला $3530 मध्ये विकले. यावर्षी मार्च महिन्यातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. एका ऑस्ट्रेलियन महिलेने आपल्या न जन्मलेल्या मुलाच्या बदल्यात आयफोन घेण्याची इच्छा न्यायालयात व्यक्त केली. यानंतर त्यांनी आश्चर्यकारक पाऊल उचलले. त्यांनी आपल्या दोन मुलींना तब्बल नऊ तास कारमध्ये कोंडून ठेवले, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.