एक्स्प्लोर
काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते.
नवी दिल्ली: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, गुरुदास कामतांच्या निधनाचं वृत्त समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची प्रायमस रुग्णालयात धाव
मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्याच वर्षी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असलेले गुरुदास कामत, यांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली.
गुरुदास कामत 2017 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिव या राज्यांची जबाबदारी होती. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते.
या वादानंतर, त्यांनी आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, असं सांगत या सर्व पदांचा राजीनामा राहुल गांधींकडे दिला होता.
5 ऑक्टोबर 1954 रोजी गुरुदास कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे जन्म झाला. त्यांचं बरेचसं आयुष्य मुंबईतील कुर्ल्यात गेलं. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. गुरुदास कामत यांच्या कुटुंबात कुणीही राजकीय क्षेत्रात नव्हते. त्यांचे वडील वसंत आनंदराव कामत हे प्रीमियर ऑटोमोबाईल्समध्ये काम करत.
1980 मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मग 1987 मध्ये त्यांची भारतीय यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. गुरुदास कामत हे 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2008 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं.
गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:
1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश
1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव
गुरुदास कामत यांचा शैक्षणिक प्रवास
गुरुदास कामत यांचं शालेय शिक्षण कुर्ल्यातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कॉमर्स शाखेसाठी माटुंग्यातील पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शिक्षणात अत्यंत हुशार विद्यार्थी होते. 1996 साली पोतदार कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा ‘प्रो. वेलिंगकर ट्रॉफी’ पुरस्कार देण्यात आला होता.
पोद्दार कॉलेजमध्ये असताना ते बॅडमिंटन टीमचे नेतृत्त्व करत, तसेच जिमखान्याचे सेक्रेटरीही होते. 1975-76 साली गुरुदास कामत यांची पोतदार कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी थेट निवड झाली होती.
त्यानंतर गुरुदास कामत यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये प्रवेश घेतला. तिथेही ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिले. गव्हर्नमेंट लॉ कॉलजच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून, मुंबई विद्यापीठात द्वितीय आले होते.
समित्यांवरील भूषवलेली पदे :
1984 – 1989 – सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1987 - 1989 – सदस्य, रेल्वे बिलासंबंधित संयुक्त समिती
1991 – 1996
सदस्य, औद्योगिक समिती
सदस्य, रेल्वे संमेलन समिती
सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1998 – 1999
सदस्य, याचिका समिती
सदस्य, पेट्रोलियम आणि केमिकल समिती
सदस्य, सल्लागार समिती, अर्थ मंत्रालय
2004 - 2009
अध्यक्ष. ऊर्जेवरील स्थायी समिती
सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम अँड नॅशरल गॅस मंत्रालय
सदस्य, अधिकृत भाषा समिती
सदस्य, अर्थ समिती
2005 – 2009
सदस्य, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया
मान्यवरांकडून श्रद्धांजली
-गुरुदास कामत यांचं निधन, काँग्रेसचा अभ्यासू चेहरा, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेला नेता हरपला : एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर
-नेहरु- गांधींचा अतिशय निष्ठावान, काँग्रेसवर प्रेम असलेला कार्यकर्ता गेल्याने काँग्रेसचं मोठं नुकसान झालं: जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक
-गुरुदास कामतांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक, राजकारणातील सदगृहस्थ आणि मुंबईच्या भल्यासाठी सातत्याने झटणारा खासदार गमावला. आम्ही भलेही लोकसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढवली असली, तरी आमच्यात चांगला संवाद होता: भाजप खासदार किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे निधन झाले. उत्तम संघटक आणि लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांप्रती अढळ श्रद्धा असणारे ते नेते होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या निधनाने अतिव दु:ख. कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली – रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
संबंधित बातम्या
गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
संजय निरुपम-गुरुदास कामत कार्यकर्ते भिडले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement