एक्स्प्लोर
यादव कुटुंबात महाभारत, नेमका वाद काय?
लखनऊ: देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या यादव कुटुंबात महाभारत सुरु झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर आज मुलायम सिंह यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही अंतर्गत कलहाची धग पूर्णपणे मिटली आहे असं काही म्हणता येणार नाही. पाच महिन्यांच्या आत होणाऱ्या यूपी निवडणुकांमध्येही याचे हादरे बसत राहणार अशी शक्यता दिसत आहे.
नेताजींची भावनिक साद
काका-पुतण्याच्या वादात समाजवादी पक्ष फुटतोय की काय अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र अखेरच्या क्षणी नेताजी अर्थात मुलायम सिंह यादव यांनी भावनिक साद घालत कुटुंबातल्या कलहावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मी जिवंत असेपर्यंत पार्टीत फूट पडणार नाही, असं मुलायमसिंह यादव म्हणाले.
या वादाची सुरुवात खाण मंत्री प्रजापती यांच्या हकालपट्टीने झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर प्रजापती यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र प्रजापती हे शिवपाल यांच्या जवळचे होते. त्यातूनच नाराजीनाट्य सुरु झालं.
नाराजी नाट्याची सुरुवात
या सगळया नाट्याची सुरुवात झाली बुधवारी. या दिवशी एखाद्या चित्रपटात शोभाव्यात अशा वेगवान घटना यूपीत घडत होत्या.
*दुपारी दोनच्या दरम्यान अखिलेशनं यूपीचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांना हटवलं. हे सिंघल शिवपाल यादव यांच्या जवळचे मानले जात होते.
*त्यानंतर मुलायम सिंह यांनी मुलाचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आणि शिवपाल यांनाच सपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमलं. शिवपाल यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न होता.
*पण अखिलेशही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्यानं मुलायम सिंह यांच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच शिवपाल यांच्याकडे असलेली महसूल, सिंचन, पीडब्ल्यूडी ही सगळी महत्वाची खाती काढून घेतली.
सख्खे भाऊ विरुद्ध मुलगा आणि चुलत भाऊ
म्हणजे शिवपाल यादव- मुलायम सिंह यादव हे सख्खे भाऊ एका बाजूला, तर दुस-या बाजूला अखिलेश आणि त्याचा चुलत काका रामगोपाल यादव असं हे चित्र.
शिवपाल यांच्याकडे उत्तर प्रदेशातली सगळी महत्वाची खाती तर होतीच. पण पक्षसंघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे. पक्षाशी संबंधित कुठल्याही बाबीत मुलायम यांना शिवपाल यांचाच भरवसा जास्त वाटायचा...पण या बुजुर्ग मंडळींचं राजकारण अखिलेशला पसंत नव्हतं...काही महिन्यांपूर्वी मुख्तार अन्सारी या गुंडाच्या कौमी एकता मंचला सपात विलीन करायचा शिवपाल यांचा प्रयत्न होता...पण अखिलेशला हे पसंत नव्हतं...आणि तेव्हापासूनच या दोघांमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात झालेली.
शिवपाल यांचं मंत्रिपद काढून घेतल्यानंतर मुलायम सिंह यांनी शिवपाल-अखिलेश यांची दिल्लीत बैठक घडवायचा प्रयत्न केला..पण अखिलेश तिकडे फिरकलाच नाही..शिवाय काल संध्याकाळी शिवपाल यांनी सपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला....आणि वातावरण आणखीनच तापलं.
शिवपाल यांच्या घराबाहेर एक प्रकारे शक्तीप्रदर्शन सुरु होतं...त्यातही काही घोषणा रामगोपाल यादव यांच्या विरोधातल्या होत्या....रामगोपाल हे मुलायम यांचे चुलत बंधू...पण ते अखिलेशच्या गोटातले मानले जातात.
अमरसिंहांची एण्ट्री
या खेळात आणखी एक महत्वाचं पात्र आहे पण ते यादव कुटुंबाबाहेरचं..त्यांचं नाव आहे अमरसिंह...मुळात अमरसिंह यांचा सपात पुन्हा प्रवेश झाला तो शिवपाल यांच्यामुळेच...अखिलेशशी त्यांचं फारसं जमत नाही...आताही शिवपाल यांनी अखिलेशला हटवून मुलायमसिंह यांनीच मुख्यमंत्री बनवण्याचा जो आग्रह सुरु केला..तो या अमरसिंहांच्याच सांगण्यावरुन..सुरुवातीचे चार वर्षे अखिलेश दबून राहिला...पण आता तो या सगळ्या बुजुर्गांना झुगारुन द्यायचा प्रयत्न करतोय.
मायावतींची टीका
उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यावर सुरु असताना सपामध्ये हा सगळा खेळ सुरु आहे....अखिलेशची छबी सुधारण्यासाठी ही नौटंकी सुरु आहे अशी टीका मायावतींनी केलीय...तर असल्या कुटुंबशाहीनंच यूपीचं नुकसान केल्याचं भाजपनं म्हटलंय...आत्ता कुठे एक्झिट पोलनं सपाच्या बाजूनं कौल द्यायला सुरुवात केली होती....पण तोवरच अशा कौटुंबिक यादवीनं ते स्वताच्याच पायावर कु-हाड मारुन घेतायत की काय असं दिसतंय.
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement