एक्स्प्लोर
काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम, राहुल गांधी दूरदर्शी असल्याची स्तुतिसुमनं
सोनिया गांधी यांनी बैठकीत राहुल गांधींचं तोंडभरुन कौतुक केलं. राहुल गांधी दूरदृष्टी असलेले नेते असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

फोटो : गेट्टी इमेज
नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधीच कायम राहणार आहेत. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत पुन्हा सोनिया गांधींची निवड करण्यात आली. याशिवाय काँग्रेसचा लोकसभा आणि राज्यसभेतील गटनेता निवडण्याचे सर्वाधिकारही सोनिया गांधींना देण्यात आले आहेत. सोनिया गांधींनी राहुल गांधी हे दूरदर्शी नेतृत्व असल्याचे कौतुकोद्गार काढले. राहुल गांधी यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे 52 खासदार इंच-इंचाची लढाई लढतील, सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर हैराण करायला ही पुरेशी संख्या आहे. आक्रमक राहा, आत्मपरीक्षण करा, अशा सूचना राहुल गांधींनी दिल्या. आपण संविधान आणि भारतीयांसाठी लढत आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी आपण कार्यरत राहू, अशा शब्दात राहुल गांधींनी उत्साह भरला. या बैठकीला राहुल गांधी, मनमोहन सिंह यांच्याशिवाय काँग्रेसचे लोकसभेतील 52 आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते. सोनिया गांधी यांनीही बैठकीत राहुल गांधींचं तोंडभरुन कौतुक केलं. राहुल गांधी दूरदृष्टी असलेले नेते असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार व्यक्त केल्याची माहितीही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. संसदेच्या आगामी अधिवेशनासाठी काँग्रेसची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 52 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधीपक्षाची जबाबदारी काँग्रेसला मिळणार नाही. राहुल गांधी यांनाच अमेठीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. पक्षातील नेत्यांनी राहुल यांचं मन वळवण्याचं प्रयत्न केले असले तरी ते निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राहुल गांधींकडे लोकसभेतील काँग्रेसचं गटनेतेपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी 16 व्या लोकसभेत ही भूमिका बजावली होती.
आणखी वाचा























