नागपूर विद्यापीठाच्या स्पोर्ट्स एक्सिलन्स सेंटरमध्ये होणार स्मार्ट यॉस टीशर्टचा वापर ; विद्यापीठ स्तरावर देशात पहिलाच प्रयोग
नागपूर विद्यापीठाच्या स्पोर्ट्स एक्सिलन्स सेंटरमध्ये युवा खेळाडूंसाठी सेन्सर आधारित स्मार्ट "यॉस टीशर्ट" वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यॉस टीशर्ट परिधान केलेल्या खेळाडूंच्या मैदानावरील हालचालींवर प्रशिक्षकांची डिजिटल नजर असणार आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्पोर्ट्स एक्सिलन्स सेंटरमध्ये युवा खेळाडूंसाठी सेन्सर आधारित स्मार्ट "यॉस टीशर्ट" वापरण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठात केंद्र सरकारच्या खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, हँडबॉल या खेळांच्या निवडक युवा खेळाडूंना स्पोर्ट्स एक्सिलन्स सेंटरमध्ये खास प्रशिक्षण दिले जात आहे. या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंची कामगिरी अजून सरस करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी सेन्सर आधारित खास यॉस टीशर्ट वापरण्यास सुरुवात झाली आहे.
खेळाडूंची कामगिरी उंचवण्याच्या दृष्टीने परदेशात त्यांच्या प्रशिक्षणात अनेक हायटेक उपकरणांचा वापर करून मैदानावर खेळाडूंची प्रत्येक हालचाल टिपली जाते. त्यांच्या शारीरिक पॅरामीटर्सवर नजर ठेऊन प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षण देतात. अशा तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा ऑलिम्पिक आणि इतर जागतिक स्पर्धांमध्ये मोठा फायदा होतो. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना स्मार्ट यॉस टीशर्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यॉस टीशर्ट परिधान केलेल्या खेळाडूंच्या मैदानावरील प्रत्येक हालचालींवर प्रशिक्षकांची डिजिटल नजर असणार आहे. यॉस टीशर्ट परिधान केलेल्या खेळाडू सराव करताना त्याच्या शरीरातील तापमान किती? हृदयाच्या ठोक्यांची गती किती? रक्तदाब, ईसीजी, शरीरातील ऊर्जेचे प्रमाण, चालण्याची, धावण्याची पध्द्त या प्रत्येक हालचालींची तंत्रशुद्ध माहिती प्रशिक्षकाला रिअल टाइममध्ये त्यांच्या लॅपटॉपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक डिजिटल ऍनॅलिसिस करून त्या खेळाडूची कमकुवत बाजू हेरून त्याची कामगिरी उंचावण्यासाठी टिप्स देऊ शकणार आहे.
भारतात जागतिक दर्जाचे चॅम्पियन्स तयार व्हावे आणि भविष्यात आणखी ऑलिम्पिक मेडल्स भारतात यावे यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला खेळाडूंसाठी खास स्पोर्ट्स वियर तयार करण्यास सांगितले होते. त्यांनतर वस्त्रोद्योग विभागाने चिप्स लागलेल्या खास यॉस टीशर्ट भारतीय खेळाडूंसाठी बनविले आहे. स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साईच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांचा वापर सुरु करण्यात आला असून विद्यापीठ स्तरावर त्याचा पहिला प्रयोग नागपूर विद्यापीठाने सुरु केला आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर असे स्मार्ट टीशर्ट्स 50 हजार रुपयांमध्ये येतात. परंतु, मेक इन इंडिया प्रॉजेक्ट अंतर्गत वस्रोद्योवग विभागाने तयार केलेली यॉस टीशर्ट अवघ्या 15 हजार रुपयांत तयार करण्यात आला आहे. अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक शरद सूर्यवंशी यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day 2022 : ITBP जवानांनी उणे 30 अंश तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन, 15 हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा
- Republic Day : भारताच्या लष्करी सामर्थ्यापासून ते सांस्कृतिक विविधतेपर्यंत, जाणून घ्या परेडशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी
- प्रजासत्ताक दिनाआधी भारताला श्रीलंकेकडून मोठी भेट, 56 भारतीय मच्छीमारांची सुटका