Sidhu Moosewala Case : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांना मोठं यश! सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून भारतात आणलं
Sachin Bishnoi : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आलं आहे. त्याला अझरबैजान येथे अटक करण्यात आली होती.
Sachin Thapan Bishnoi Arrested : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सामील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिनला अझरबैजान येथे अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिन थापनने दुबईमध्ये बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला भारतात आणलं
पंजाब पोलिसांनी सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा आरोपी सचिन थापन बिश्नोई याला अझरबैजानमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचण्यामध्ये सचिन थापन याचा हात होता. हत्येचा कट रचण्यासाठी सचिन गोल्डी ब्रारशी सतत फोनवर संपर्कात होता आणि दोघांचं अनेक वेळा संभाषण झालं. भारत सरकारच्या पाठिंब्याने सचिन थापनला अझरबैजानमध्ये पकडण्यात आलं त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं.
लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी; दुबईतून रचला कट
सचिन थापन हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वीच सचिन थापन बनावट पासपोर्टवर भारत सोडून पळून गेला होता. सचिन थापन गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा खास सहकारी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस गोल्डी ब्रारचाही शोध घेत आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गोल्डी ब्रारविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
गँगस्टर विक्रम ब्रारला यूएईमधून भारतात आणलं
सचिनपूर्वी 26 जुलै रोजी लॉरेन्स बिश्नोईचा आणखी एक सहकारी विक्रम ब्रार याला यूएईमधून भारतात आणल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये विक्रम ब्रारच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय तो टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यातही वॉन्टेड आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या आवाहनावरून त्याच्याविरोधात 11 लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. 2020 पासून लॉरेन्स बिश्नोई फरार होता.
आतापर्यंत 16 जणांना अटक
मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे आहे. याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम ब्रार यूएईमध्ये लॉरेन्स बिश्नोई टेरर गँगसाठी कम्युनिकेशन कंट्रोल रूम म्हणून काम करत होता. अशा प्रकारे लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनाही कॉलची सुविधा दिली जात होती. या दोघांच्या सांगण्यावरून विविध लोकांना खंडणीसाठी फोनही केले जात होते.