विमानाला लेझर लाईट दाखवल्यास होऊ शकते अटक, जाणून घ्या काय आहेत नियम
Airline Rule and Regulation : जर तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या छतावरून विमान उडत असेल तर हे लक्षात ठेवा, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते.
![विमानाला लेझर लाईट दाखवल्यास होऊ शकते अटक, जाणून घ्या काय आहेत नियम Showing a laser light to an aircraft can cause arrests, find out what the rules are विमानाला लेझर लाईट दाखवल्यास होऊ शकते अटक, जाणून घ्या काय आहेत नियम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/543e2a7574d41c97da40a9f7b3a72ca51657474008_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Airline Rule and Regulation : जर तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या छतावरून विमान उडत असेल तर हे लक्षात ठेवा, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते. नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्याही भारतीय विमानतळाच्या परिसरात विमानावर लेझर लाइट फ्लॅश (Laser Light Flash) करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे.
केंद्र सरकारने 6 जुलै रोजी अधिसूचनेद्वारे विमान नियम 1937 मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. लेझर लाईट वापरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर त्याला आधी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याकडून नोटीस दिली जाईल, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. अशा व्यक्तीने नोटीस मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत लेझर लाईट फ्लॅश करणे बंद न केल्यास केंद्र सरकारला ठोस पावले उचलण्याचा अधिकार आहे. तसेच भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत कारवाई करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अधिसूचत म्हटले आहे की, जर व्यक्तीची ओळख पटू शकली नाही, तर प्रभावित एअरलाइन ऑपरेटर किंवा विमानतळ ऑपरेटर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवतील. लेझर लाईट फ्लॅश करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस आयपीसीच्या कलमांखाली कारवाई करू शकतात.
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हितधारक आणि सामान्य नागरिक 6 ऑगस्टपर्यंत विमान नियम 1937 मधील या प्रस्तावित सुधारणांवर त्यांच्या सूचना देऊ शकतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवरात्रीदरम्यान अनेक वैमानिकांनी अशा तक्रारी केल्या होत्या. वैमानिकांनी कोलकाता विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाकडे तक्रार केली होती की, विमान लँडिंग करत असताना त्यांचे लक्ष विचलित होत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये इंडिगोच्या पायलटने दिल्ली विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाकडे अशीच तक्रार केली होती.
विमान क्रॅश होऊ शकते
आजकाल लेझर लाइटचा वापर लग्न, पार्ट्या किंवा जत्रा आणि सणांमध्ये केला जातो. लेझर लाइटचा प्रकाश खूप दूर जातो. विमानतळावर विमानांची वर्दळ असते. विमानतळाच्या आजूबाजूला अशा लेझर लाईट फ्लॅश होत असल्याने वैमानिकाचे लक्ष वेधले जाते. विमान सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक आहे. वैमानिकाचे लक्ष विचलित झाल्यामुळे विमान अपघातही होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)