Jama Masjid Row: दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला प्रवेश बंदी
Jama Masjid Shahi Imam Notice: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी जामा मशिदीचे इमाम यांना नोटीस पाठवली आहे.
Women Entry Ban In Jama Masjid: दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा मुलींच्या समुहाला प्रवेश बंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी जामा मशिदीचे इमाम यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जामा मशिदीबाहेर मुलींच्या प्रवेश बंदीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. यावर मुलींना मशिदींमध्ये प्रवेश नसल्याचं लिहिण्यात आलेलं आहे. मशीद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. मशीद परिसरात व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मशीद प्रशासनाच्या या निर्णायाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
महिला आयोगाची नोटीस -
जामा मशिदीमध्ये मुलांना प्रवेश बंदी केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालवीय यांनी मशीद प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्वाती मालवीय यांनी यांनी ट्वीट करत प्रतिक्रियाही दिली आहे. “जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशबंदी हा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात मशिदीच्या इमामांना महिला आयोग नोटीस बजावत आहे. महिलांना प्रवेश नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही”, असं ट्वीट मालवीय यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वाती मालवीय म्हणाल्या की, महिलांना मशिदीमध्ये प्रवेश न देणं असंवैधानिक आहे. भारतामध्ये तालिबानी आदेश/निर्णय चालणार नाहीत. जामा मशिदीच्या इमामांना नोटीस पाठवत याप्रकरणी उत्तर मागितले आहे.
जामा मस्जिद में महिलाओं की एंट्री रोकने का फ़ैसला बिलकुल ग़लत है। जितना हक एक पुरुष को इबादत का है उतना ही एक महिला को भी। मैं जामा मस्जिद के इमाम को नोटिस जारी कर रही हूँ। इस तरह महिलाओं की एंट्री बैन करने का अधिकार किसी को नहीं है।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 24, 2022
काय आहे प्रकरण?
दिल्लीमधील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये एकट्या मुलीला अथवा समुहानं मुलींना प्रवेश बंद करण्यात आल्याची नोटीस मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर शाही इमाम यांनी म्हटले की, नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या मुलींसाठी हा आदेश नाही. मशीद परिसरात व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
शाही इमाम सैयद अहमद बुखारी म्हणाले की, मशीद परिसरात काही घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जामा मशीद हे प्रार्थनास्थळ आहे, येथे प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत आहे. पण धार्मिक स्थळावर अयोग्य कृत्य झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. जेव्हा महिला एकट्या येतात तेव्हा परिसरात गैरप्रकार घडतात. व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मशिदीत येणाऱ्या कुटुंबांवर अथवा विवाहित दाम्पत्यांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही. दरम्यान, विश्व हिंदू परिषदचे प्रवक्ता विनोद बंसल यांनी जामा मशिदीच्या या निर्णायावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. भारताला सीरिया करण्याची ही मानसिकता असल्याचे ट्वीट त्यांनी केलेय.