(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravi Belagere Death | प्रख्यात कन्नड पत्रकार, लेखक आणि Hai Bangalore चे मुख्य संपादक रवी बेलागेरे यांचं निधन
Ravi Belagere Death: रवी बेलागेरेंचे 'Hai Bangalore' हे कन्नड टॅब्लॉइड लोकप्रिय आहे. एका कन्नड वाहिनीवरील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित कार्यक्रमाने त्यांना प्रसिध्दी मिळवून दिली.
बेंगलुरु: विख्यात पत्रकार आणि लेखक रवी बेलागेरे यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. रवी बेलागेरे यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते पण त्यांच्यावर उपचाराचा कोणताही परिणाम होत नव्हता आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. बेलागेरे यांचे पार्थिव साऊथ बेंगलुरु येथील प्रार्थना शाळेच्या परिसरात ठेवण्यात येणार आहे जेणेकरुन लोकांना त्यांना अंतिम श्रध्दांजली वाहता येईल.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी रवी बेलागेरेंच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. एक पत्रकार आणि साहित्यिक या नात्याने बेलागेरे यांनी दिलेल्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी देवाकडे प्रार्थना करतो की बेलागेरे यांचा परिवार आणि चाहत्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो." कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
कोण आहेत रवी बेलागेरे? रवी बेलागेरे हे कर्नाटकातील एक ख्यातनाम नाव आहे. ते मुळचे बेल्लारी जिल्ह्यातले आहेत. त्यानी त्यांच्या करिअरची सुरुवात बेल्लारीतील एका महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून केली. 1984 साली ते बेंगलुरुत आले. त्यांनी 1995 साली 'हाय बेंगलुरु' हे कन्नड टॅब्लॉइड सुरु केले. हाय बेंगलुरु हे कन्नड टॅब्लॉइड बेंगलुरु शहरात आणि कर्नाटकात प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये बेंगलुरुतील गुन्हेगारी विश्वाची माहिती देण्यात येते.
बेंगलुरुच्या क्राईम ब्रँचने 2017 साली एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी दिल्याबद्द्ल त्यांना अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. त्यांनी एका कन्नड वाहिनीवर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित एक कार्यक्रम सुरु केला होता. त्यामुळे ते प्रसिध्दीच्या झोतात आले.
बेलागेरे यांनी 70 पेक्षा अधिक साहित्यिक रचना रचल्या आहेत. गल्प, अनुवाद, कहाणी, स्तंभ लेखन आणि जीवनी या त्यातील काही प्रसिध्द रचना आहेत. गुन्हेगारी विश्वातील लेखनासाठी रवी बेलागेरे प्रसिध्द होते. रवी बेलागेरे यांनी ‘पापीगाला लोकाडल्ली’ या त्यांच्या स्तंभात बेंगलुरुतील अंडरवर्ल्डवर लेखन केले जे खूपच लोकप्रिय झाले. त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, कर्नाटक मीडिया अकॅडमीचा जीवनगौरव पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: